काटोल : काटोल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. अशात सर्वत्र ई-पॉस मशीनवर अंगठा लावूनच रेशन दुकानांमधून ग्राहकांना धान्याचे वितरण सुरू आहे. यामुळे ई-पॉस मशीन कोरोना संक्रमणासाठी वाहकाची भूमिका वठवतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. तालुक्यात १५ रेशन दुकानदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दुकानात रेशन घेण्यासाठी विविध गावांचे नागरिक येतात. अशात ई-पॉस मशीनवर अंगठा लावून रेशन देण्याचा नियम आहे. त्यामुळे किमान कोरोनाचे संक्रमण थांबेपर्यंत ही पद्धत बंद करण्यात यावी, अशी मागणी रेशन दुकानदारांकडून केली जात आहे. ऑफलाइन पद्धतीने किंवा नॉमिनीचे आदेश काढून धान्य वितरणास परवानगी द्यावी, अशी मागणी माजी उपसभापती अनुप खराडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर, हात वारंवार धुणे असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे या संकटकाळातही रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीनवर ग्राहकांचा अंगठा लावूनच धान्य वितरण सुरू आहे. हे तातडीने बंद होणे गरजेचे असल्याचे मत खराडे यांनी व्यक्त केले.
ई-पॉस मशीन धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:09 AM