लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत रेल्वेगाड्यातील गर्दी वाढल्यामुळे ई तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. गुरुवारी रात्री रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.७८ लाखाच्या ११४ ई तिकीट आणि १.०३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला वरुड शहरात ई तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी यांची चमू गठीत करण्यात आली. चमूने वरुड येथे जैन मंदिरासमोरील कल्पतरू सर्व्हिसेस नावाच्या दुकानावर धाड टाकली. दुकानाच्या मालकाने आपले नाव हेमंत गोपालराव घंगारे (३५) रा. वॉर्ड नं. १२, जैन मंदिरासमोर, वरुड, अमरावती सांगितले. त्याच्याकडून पर्सनल आयडीवरून काढलेली १८ आणि बनावट आयडीचा वापर करून काढलेली २० ई तिकिटे किंमत ३१३१९ रुपये आढळली. यापूर्वी त्याने काढलेल्या ८५ तिकीट किंमत १.३० लाख अशी एकूण १०५ तिकिटे किंमत १.६१ लाख तसेच कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल असा ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत यावलकरनगर, पेट्रोल पंपाच्या मागील आर्या टुर अँड ट्रॅव्हल्सवर धाड टाकण्यात आली. दुकानाच्या मालकाने आपले नाव चेतन अशोक राऊत (२९) रा. वॉर्ड नं. ३, यावलकरनगर, पेट्रोल पंपाच्या मागे, वरुड असे सांगितले. त्याच्या जवळ आयआरसीटीसीचे लायसन्स नसल्याचे स्पष्ट झाले. दुकानाची तपासणी केली असता आरोपीने पर्सनल व फेक आयडीचा वापर करून ९ तिकिटे किंमत १७०४२ काढल्याचे आढळले. याशिवाय दुकानातील कॉम्प्युटर, प्रिंटर, मोबाईल असा एकूण ६२०९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींनी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
६९ लाखाची ई तिकिटे जप्तरेल्वे सुरक्षा दलाने आॅक्टोबर महिन्यात ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीविरुद्ध अभियान सुरू केले. यात आठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६९ लाख ४८ हजार २५३ रुपयांच्या ३११० ई तिकिटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय ४ लाख ६७ हजार ६४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.