लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. आरपीएफला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अशाच एका ई-तिकीट दलालास टेकानाका येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून संगणक, तिकिटांच्या यादीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक सचिन दलाल, मनोज धायगुडे, जवान सी. एच. गाढवे, अनिस खान, अमित बारापात्रे, अश्विन पवार यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने टेकानाका, कामठी रोड येथील मॉडर्न ट्रेडर्सवर धाड टाकली. तेथे असलेल्या व्यक्तीने आपले नाव मो. फैज अंसारी (३०) रा. वॉर्ड नं. ३, दहेगाव रंगारी असे सांगितले. रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांबद्दल विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या परवानगीनंतर दुकानातील संगणकाची तपासणी केली असता त्यात पाच पर्सनल आयडी आढळल्या. त्याचा पासवर्ड विचारला असता फैज अंसारीने माहिती दिली नाही. या पर्सनल आयडीवरून प्रबल सॉफ्टवेअरच्या मदतीने माहिती काढली असता १ लाख ४६ हजार ८४५ रुपये किमतीच्या १५६ जुन्या ई-तिकिटांची यादी मिळाली. या पर्सनल आयडीत त्याच व्यक्तीचा मोबाईल क्रमांक रजिस्टर असल्याचे समजले. त्या आधारे १५६ जुनी ई-तिकिटे, संगणक, मोबाईल, मॉडेम जप्त करण्यात आले. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार आरोपीविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.