लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ई-तिकिटांच्या काळाबाजारीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला असून, रेल्वे सुरक्षा दलाने चालू वर्षात १५ ठिकाणी छापे मारून ११.५० लाख रुपयांच्या ई-तिकिटा जप्त केल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतिजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाने हिंगणा एमआयडीसी परिसरातील समांतर ई-तिकीट केंद्रावर धाड टाकून १ लाख २८ हजार रुपयांच्या ई-तिकिटा जप्त केल्या. या कारवाईबद्दल माहिती देताना ते बोलत होते.निखील शर्मा (३०) रा. एमआयडीसी, हिंगणा आणि राजेश जयस्वाल (५२) रा. रडके लेआऊट, हिंगणा रोड, अशी आरोपींची नावे आहेत. बनावट आयडीच्या मदतीने रेल्वे तिकिटांची खरेदी करून प्रति व्यक्ती २५० ते ४०० रुपये अतिरिक्त आकारून ते विक्री करीत होते. त्यांच्या या व्यवसायाची माहिती आरपीएफला मिळाली होती. त्याआधारे चाचपणी सुरू करण्यात आली. त्यांच्याकडे जाऊन जवानांनी तिकीटही खरेदी केले. यानंतर आज प्रत्यक्ष छापा टाकण्यात आला. शर्माने २२ फेक आयडी वापरून ६७ हजारांच्या ४९ तिकिटांची खरेदी केल्याचे आढळले. तो गेल्या पाच वर्षांपासून तिकिटांचा काळाबाजार करीत होता. जयस्वालकडे १४ हजार ५०० रुपये किमतीच्या १२ तिकिटा आढळल्या. दोन्ही कार्यालयांमधून संगणकासह अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याचे सतिजा यांनी सांगितले. दोन्ही कार्यालयातील संगणक जप्त करण्यात आले असून अजूनही तिकिटा मिळतील, असा विश्वास सतिजा यांनी व्यक्त केला. या कारवाईत उपनिरीक्षक राजेश औतकर, होतिलाल मीणा, सीताराम जाट, सुभाष जुमळे, राकेश करवाडे, विकास शर्मा, अश्विन पवार, अमित बारापात्रे, ओमेश्वर चौहान आदींचा समावेश होता.काळाबाजार करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करावेई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी आयआरसीटीसीकडे केली असल्याचे सतिजा यांनी सांगितले. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी सायबर सेलची गरज असून, हा विषय वरिष्ठ पातळीवरही मांडला असल्याचे ते म्हणाले.