लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे मुख्यालय, गुन्हे शाखा आणि मॉडर्नायझेशन टीमने सोमवारी संयुक्त कारवाई करून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ११३ ई-तिकिटा जप्त केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनी गठित केलेल्या चमूतील सदस्य गुन्हे शाखेचे निरीक्षक एस. के. मिश्रा, उपनिरीक्षक शिवराम सिंह, होतीलाल मीणा, विजय पाटील, दीपक वानखेडे, अश्विन पवार, अमित बारापात्रे, आनंद गायकवाड आणि सहायक उपनिरीक्षक पी. के. मिश्रा यांनी सोमवारी प्रतापनगर पोलिसांच्या सहकार्याने गुप्ता अँड झेरॉक्सवर धाड टाकली. दुकानातील व्यक्तीने आपले नाव हितेश कैलाश गुप्ता (३६) रा. त्रिमूर्तिनगर सांगितले. ई-तिकिटांच्या काळाबाजाराबाबत चौकशी केली असता त्याने आपणास याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यावर आरपीएफने दोन पंचांसमक्ष दुकानातील संगणकाच्या माध्यमातून आयआरसीटीसीच्या लायसन्सशिवाय वेगवेगळ्या नावाचे १२ बनावट खाते उघडून ३ लाईव्ह ई-तिकीट किंमत ८०४० ची प्रिंट काढण्यात आली. याबाबत चौकशी केली असता हितेशने आयआरसीटीसीच्या लायसन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या नावाने १२ बनावट आयडीच्या साह्याने प्रवाशांच्या मागणीनुसार ई-तिकिटा पुरवीत असल्याची कबुली दिली. त्यासाठी प्रत्येक तिकिटावर २०० ते ३०० रुपये कमिशन घेत असल्याचे त्याने सांगितले. या आधारावर उपनिरीक्षक शिवराम सिंह यांनी अवैधरीत्या काढलेली ११० जुने ई-तिकीट (२ लाख २ हजार ३३८ रुपये), एक संगणक, प्रिंटर, दोन डोंगल, एक राऊटर, मोबाईल जप्त केला. आरोपीला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार त्याच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. चौकशीत आणखी ई-तिकिटा मिळण्याची शक्यता रेल्वे सुरक्षा दलाने व्यक्त केली आहे.
नागपुरात ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:03 PM
रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे मुख्यालय, गुन्हे शाखा आणि मॉडर्नायझेशन टीमने सोमवारी संयुक्त कारवाई करून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ११३ ई-तिकिटा जप्त केल्या आहेत.
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : ११३ ई-तिकिटा, संगणक जप्त