लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून त्याचे कडून ५६७७ रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाला कान्होलीबारा येथे ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरपीएफचे निरीक्षक सी. एल. कनोजिया, एस. के. मिश्रा, उपनिरीक्षक शिवराम सिंह, आर. के. यादव, मनोज काकड, मुकेश राठोड, दिलीप पाटील, अमित बारापात्रे, अश्विन पवार, आनंद करवाडे, प्रदीप गुजर, सागर लाखे यांनी संबंधित व्यक्तीच्या मास्टर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कान्होलीबारा या प्रतिष्ठानावर धाड टाकली. त्याने आपले नाव प्रवीण प्रभाकर कारबे (३८) रा. घर क्रमांक २८३, वॉर्ड क्रमांक ४ कान्होलीबारा सांगितले. त्याच्या लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात भविष्यातील प्रवासाचे २ तिकीट किंमत २८९६ तसेच जुनी २ तिकिटे किंमत २७८१ असे एकुण ५६७७ रुपये किमतीची तिकिटे आढळली. त्याच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.