लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाने वरुड येथील एका फोटो स्टुडिओमध्ये छापामार कारवाई करून ई-तिकिटाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला. या कारवाई ई-तिकीट संदर्भातील साहित्य जप्त करून, इंडियन रेल्वे अॅक्टच्या कलम १४३ अन्वये कारवाई केली. नरखेड येथील आरपीएफच्या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या काळाबाजाराचा तपास सुरू आहे.ई-तिकीटची सुरू असलेल्या काळाबाजारासंदर्भात मिळालेल्या गुप्त सुचनेनुसार आरपीएफची नागपूर टीम व नरखेडच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. यात आरपीएफच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, कॉन्स्टेबल दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीलकंठ गोरे व नरखेडचे कॉन्स्टेबल नसीरखान पठाण, सुरेंद्रनाथ यादव, अमित बारापात्रे, अश्विन पवार व अशोक सहभागी झाले होते. आरपीएफ कमांडट ज्योतिकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात १७ आॅगस्टला सकाळी ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. पथकाने वरुड तालुक्यातील माँ फोटो स्टुडिओवर छापा टाकला. येथे ६०२८० रुपये किंमतीच्या २५ ई-तिकीट व बनावट ओळखपत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ४४ तिकिटे जप्त करण्यात आली. याची किंमत १ लाख ५ हजार ७५८ रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर संगणक व काळाबाजाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. त्याची किंमत १ लाख ६६ हजार ३८ रुपये आहे. स्टुडिओचे संचालक रामगोपाल शर्मा (५१) याने मान्य केले की, काळाबाजार करून, गरजूंकडून अतिरिक्त पैसे घेऊन तिकीट उपलब्ध करून देण्यात येते. आरपीएफच्या नरखेड शाखेने फोटो स्टुडिओ संचालकाला अटक केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोरसकुमार यांच्या नियंत्रणात सुरू आहे.