सुमेध वाघमारे
नागपूर : कानाच्या व कानातून जाणाऱ्या मार्गाने मेंदूच्या अनेक शस्त्रक्रिया शिकण्यासाठी या ‘टेम्पोरल बोन’वर सराव आवश्यक ठरतो. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला हा ‘बोन’ मिळेलच असे नाही. यामुळे कान, नाक, घसा तज्ञ्ज डॉ. प्रशांत नाईक यांनी ‘थ्रीडी टेम्पोरल बोन प्रिंट’ची संकल्पना मांडली. याला ‘व्हीएनआयटी’चे प्राध्यापक व त्यांच्या मार्गदर्शनात एम.टेक.च्या विद्यार्थ्याने मूर्त रूप दिले. यामुळे अवघड शस्त्रक्रिया सोपी होण्यास मदत झाली.
मेंदूवरील शस्त्रक्रिया कवटी उघडून केल्या जातात. यात जीवासोबतच अपंगत्वाची भीती राहते. शस्त्रक्रियेनंतर इस्पितळात राहण्याचे दिवसही वाढतात. परंतु नाकातून किंवा कानातून इंडोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया केल्यास जीवाच्या धोक्यासह इस्पितळातील दिवसही कमी होतात. परंतु त्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. त्यासाठी कानाचे हाड ज्याला ‘टेम्पोरल बोन’ म्हणतात त्यावर सराव करणे महत्त्वाचे ठरते. परंतु आधीच कमी होत असलेल्या देहदानामुळे हे बोन प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही. बाजारात याचे प्लास्टिक मॉडेल उपलब्ध आहेत. परंतु त्यातून शस्त्रक्रियेदरम्यान प्रत्येक बाब लक्षात येत नाही.
ही बाब प्रकर्षाने लक्षात घेत कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईक यांनी ‘टेम्पोरल बोन’ थ्रीडी प्रिंट करण्याची संकल्पना मांडली. व्हीएनआयटीच्या यांत्रिकी (मेकॅनिकल ) विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. रश्मी उद्दनवाडीकर आणि जबलपूर येथील एम.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केलेला पीयूष उके यांनी त्याला साकार केले. जवळपास दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने हे ‘थ्रीडी टेम्पोरल बोन’तयार करण्यास यश आले. त्यातून कानाच्या प्रतिकृतीतील सर्व बारकाव्यांमुळे व त्याच्या किफायतशीर उपलब्धतेमुळे शस्त्रक्रिया शिकणे शक्य झाले आहे.
-थ्रीडी प्रिंटेड बोन्सची निर्मिती
डॉ. नाईक यांनी सांगितले, सध्या अशा व या प्रकारच्या इतर थ्रीडी प्रिंटेड बोन्सची निर्मिती ‘न्यू ओसा’ या नावाने नोंदणी झालेल्या कंपनीद्वारे होत आहे. व्हीएनआयटीच्या इनक्युबेशन सेंटर येथे स्टार्टअप केंद्र असणाऱ्या ‘न्यू ओसा मेडिक्विप प्रा.लि.’ कंपनीच्या संचालकपदी डॉ. सुभाष लुले, डॉ. प्रशांत नाईक, डॉ. शशांक लुले, पीयूष उके आणि संस्थापक सल्लागार डॉ. रश्मी उद्दनवाडीकर यांचा समावेश आहे.
-‘बायरेक’कडून ५० लाखाचा निधी
डॉ. प्रशांत नाईक यांनी ‘टेम्प्ररल बोन' वर आधारित संकल्पनेला बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिसटन्स कौन्सिलतर्फे (बायरेक) ५० लाख रुपयाची निधीही मिळाला आहे.