सुदाम नगरीतील प्रकार : महापालिकेचा संतापजनक प्रताप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वित्तमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यभर मोहीम राबवून चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण केले. आता पर्यावरणाचे सेनापती गावागावात निर्माण करून पुढील वर्षी ‘एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष’ लागवडीचा संकल्पही त्यांनी सोडला. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने वृक्षारोपण सप्ताहात लावलेली झाडे जेसीबीने उपटून फेकली. या धक्कादायक प्रकारामुळे वृक्षारोपण मोहिमेलाच तडा गेला आहे. मुनगंटीवार यांनी १ ते ७ जुलै दरम्यान राज्यभर वृक्षारोपण मोहीम राबवली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या मोहिमेंतर्गत नागपूर महापालिकेचे आयुक्त व उपमहापौर यांनी १ जुलै रोजी सुदामनगरी भागात वृक्षारोपण केले. या सोहळ्याचे फोटोसेशनही करण्यात आले. मात्र, चारच दिवसांनी ४ जुलै रोजी या कोवळ्या झाडांची कत्तल करण्यात आली. वृक्षारोपण करण्यात आलेली जमीन समतल करण्यासाठी महापालिकेतर्फे जेसीबी चालवून माती उकरण्यात आली. यात बहुतांश झाडे उपटून निघाली. काही झाडे तुटली. तर काही मातीखाली दबल्या गेली. महापालिकेने एकप्रकारे कोवळ्या रोपांचा बळी घेतला आहे. उरलेल्या रोपांचीही अवस्था बिकट झाली आहे.दोन कामात समन्वय नाही महापालिकेला सुदामनगरीतील संबंधित जमीन समतल करायचीच होती तर त्या जमिनीवर आधी वृक्षारोपण करायचे नव्हते. किंवा आधी जमीन समतल करून नंतर वृक्षारोपण करायचे होते. मात्र, दोन कामांमध्ये समन्वय ठेवण्याची तसदी महापालिकेने घेतली नाही. मनपाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे मोहिमेत लावलेल्या झाडांचा बळी गेला. या प्रकारणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. झाडांना कुंपण करणार लावलेल्या काही झाडांची पाने, फांद्या जनावरांनी खाऊन टाकल्या आहेत. झाडांच्या सुरक्षिततेसाठी सुदाननगरीत वृक्षारोपण करण्यात आलेल्या भागाला महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे तारेचे कुंपण केले जाणार आहे. येत्या १० दिवसात हे काम पूर्ण होईल. सर्व झाडे जगतील याची काळजी घेतली जाणार आहे. - महेश मोरोणे सहायक उपायुक्त
आधी झाडे लावली नंतर जेसीबीने नष्ट केली
By admin | Published: July 08, 2017 2:11 AM