नागपूर : कर्करोगाचे लवकर निदान झाले तर तो बरा होऊ शकतो हे नागरिकांना पटवून देण्यासाठी ‘लोकमत’ समूह व ‘कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’ यांनी ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पथनाट्य, सखी मंचचे कार्यक्रम, डॉक्टरांसाठी ‘सीएमई’ यांच्या माध्यमातून ज्या लोकांना कर्करोग झाला आहे किंवा जे कर्करोगाच्या विळख्यातून बाहेर पडून आरोग्यदायी जीवन जगत आहेत, अशा लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कर्करोगावरील जागृतीच्या या राज्यस्तरीय उपक्रमात ‘लोकमत’ समूहासोबत जुळणे ही ‘कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’साठी गर्वाची बाब आहे. आपल्या देशात व विशेषत: राज्यात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही धोक्याची घंटा आहे. जागतिक पातळीवर कर्करोगाचा दोन आघाड्यांवर सामना करण्यात येतो. अत्याधुनिक उपचार आणि कर्करोग टाळण्यासाठी तसेच निदान लवकर व्हावे यासाठी जागृती यावर भर देण्यात येत आहे. इतर आजारांप्रमाणे कर्करोगातदेखील उपचारापेक्षा बचाव जास्त महत्त्वाचा ठरतो. राज्यावरील कर्करोगाचे ओझे कमी व्हावे यासाठी जनजागृतीवर या उपक्रमाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आमचे तज्ज्ञ आणि तुमचा संपर्क यांच्या माध्यमातून कर्करोगासोबत लढा देऊन त्यावर विजय मिळविणे शक्य आहे’, असे मत कोकिळाबेन धीरुभाई अंबानी इस्पितळाचे कार्यकारी संचालक डॉ. राम नारायण यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)
लवकर निदानातूनच होऊ शकतो कर्करोगापासून बचाव
By admin | Published: April 26, 2017 1:38 AM