मिरवणुकीवर वॉच विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त सहा हजार पोलीस तैनातसीसीटीव्ही कॅमेऱ्याने ठेवणार नजर नागपूर : गणपती विसर्जन सुरळीतपणे पार पडावे आणि गणेशभक्तांसह कुणाचीही गैरसोय होऊ नये याकरिता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तब्बल सहा हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्हीसह वॉच टॉवरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विसर्जनाचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. असे आहेत विसर्जनाचे मार्ग फुटाळा तलाव :उत्तर, मध्य आणि पूर्व नागपूरमधून येणारे गणपती जपानी गार्डन ते तेलंखेडी तलाव या मार्गाने नेण्यात येतील. दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपूरमधून येणारे गणपती कल्याणेश्वर मंदिरापर्यंत आणले जातील. गांधीसागर तलाव :इतवारी भागातून येणारे घरगुती गणपती अग्रसेन चौक, चिटणीस पार्क मार्गाने टिळक पुतळा व गांधीसागर तलावाकडे येतील. बडकस चौकाकडून येणारे घरगुती गणपती हे गांधीगेट मार्गाने तलावाकडे न्यावेत. नवीन शुक्रवारी व सक्करदराकडे जाणारी वाहने गणेशपेठ पोलीस ठाण्याकडून मॉडेल मिल मार्गाने परत जातील. टिळक पुतळा ते गांधीगेट आणि गांधीगेट ते चिटणीस पार्ककडे जाणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नातिक चौक ते चिटणीस पार्क हा रस्ता दोन्ही बाजूंच्या रहदारीकरिता बंद करण्यात आला आहे. आग्यारामदेवी ते एम्प्रेस मिल टी पॉर्इंटकडे आणि एम्प्रेस मिल टी पॉर्इंट ते नातिक चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. नाईक तलाव : पाचपावली भागाकडून गणेशमूर्ती विसर्जनाकरिता येणाऱ्या भाविकांनी कमाल चौक पाचपावली पोलीस ठाणे ते बारसेनगर येथून तांडापेठ विणकर कॉलनी मार्गाने पंचकमिटी टी पॉर्इंटपर्यंत यावे. तसेच येथेच विसर्जनाकरिता आणलेली गणेशमूर्ती उतरवून डावीकडील मार्गाने नाईक तलाव येथे विसर्जनाकरिता जातील. सोनेगाव तलाव : सोनेगाव तलावावर येणारे गणपती सावरकर चौक येथून खामला रोड मार्गाने सहकारनगर मार्गे तलावावर येतील. गणेशमूर्ती विसर्जन झाल्यावर ही वाहने भेंडे ले-आऊट जयताळा मार्गाने परत जातील. तसेच वर्धा मार्गाने येणारे गणपती राजीवनगर टर्निंग ते सोनेगाव तलाव या मार्गाने येतील. नक्षलविरोधी पथक तैनात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नक्षलविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच एसआरपीसह सीआयएसएफ कमांडोंची पहिल्यांदा मदत घेतली जाणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करून त्यांना साध्या गणवेशात मिरवणुकीत ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून कोणत्याही संशयित हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
पुढच्या वर्षी लवकर या...
By admin | Published: September 27, 2015 2:18 AM