लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशासाठी ताप खरोखर चिंतेची बाब आहे. जर याचे लवकर निदान झाले तर पुढे निर्माण होणारी गुंतागुंत, अन्य विकृती व जीवाचा धोका टाळता येऊ शकतो,असा सूर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) वतीने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञानी काढला.पावसाळ्यात डासांच्या प्रादुर्भावाने विविध तापाचे आजार डोके वर काढतात. ही जाणीव ठेवत ‘आयएमए’ नागपूर शाखेने उपसंचालक आरोग्य सेवा (डीडीएचएस) यांच्या संयुक्त विद्यमाने तापावर अद्ययावत उपचार या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल उपस्थित होते. यावेळी तापाच्या विविध बाबींवर प्रकाश टाकताना डॉ. शंकर खोब्रागडे यांनी तापाचे वेळीच निदान किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्या धोक्याची माहिती दिली. तापाचे मूळ शोधण्यासाठी प्रयत्न झालाच पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. डॉ. आनद काटे यांनी ‘स्क्रब टायफस’ तापासंबंधी मार्गदर्शन केले. मलेरियाचे योग्य निदान झाले नाही तर परिस्थिती उपचारापलीकडे जाऊ शकते, असे मत डॉ. पी.पी. जोशी यांनी व्यक्त केले. डॉ. अर्चना देशपांडे यांनी मेंदूज्वरास कारणीभूत असलेले विषाणूंचे प्रकार स्पष्ट केले. ‘लेप्टोस्पायरा’ जीवाणूमुळे होणारा ‘लेप्टोस्पायरोसिस’ तापाचा आजार पूर परिस्थिती अथवा पावसाळ्यात होत असल्याची माहिती डॉ. शिल्पा देवके यांनी दिली.डॉ. संजय जयस्वाल यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, या रोगांवर मात करण्यासाठी शासन सज्ज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात तापासंबंधित औषधे उपलब्ध आहेत. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनजागृतीसोबतच उपाययोजना केल्या जात आहेत.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय उपाध्याय व डॉ. रामविलास मलानी होते. संचालन डॉ. प्राजक्ता कडूस्कर यांनी तर आभार आयएमएच्या सचिव डॉ. मंजुषा गिरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. अर्चना कोठारी, डॉ. रफात खान, डॉ. प्रकाश देव, डॉ. आलोक उमरे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. वंदना काटे, डॉ. शिरीष मोदी, डॉ. प्रशांत भूतडा यांनी विशेष प्रयत्न केले.