मंगेश व्यवहारे
नागपूर : आजकाल प्रत्येकाचे जगणे पळापळीचे झाले आहे. सगळ्याच गोष्टी आता इन्स्टंट, फास्ट, पटापट हव्या आहेत. त्यात खाद्यपदार्थांचाही समावेश झाला आहे. पती-पत्नी नोकरीपेशात असलेल्या कुटुंबात फूड डिलिव्हरीची मागणी जास्त वाढली आहे. घरातच बसून नामांकित रेस्टॉरेंटची टेस्ट मिळत असल्यामुळे डिलिव्हरीच्या रूपात द्यावे लागणारे ४० ते ५० रुपये देताना कुठलाही संकोच नसतोच. हेच ४०-५० रुपये कमविण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा जीवघेण्या पळापळीत तो स्वत:बरोबर इतरांचाही जीव टांगणीला लावत आहे. सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहे. या पळापळीत डिलिव्हरी देणाऱ्याने नागपुरातच नाही तर इतरही शहरांमध्ये अपघातात जीव गमावला आहे.
‘लोकमत’ने ही जीवघेणी घाई कशासाठी? यासंदर्भात फूड डिलिव्हरी करणाऱ्यांशी संवाद साधला. ते वाहतुकीचे नियम कसे पायदळी तुडवतात यासाठी त्यांचा पाठलाग केला. ४०-५० रुपयांसाठी ते कशी कसरत करतात, वाहने कशी वेगाने चालवितात, सिग्नल जम्प करण्याची संधी मिळताच कशी वाहने दामटतात, हे कॅमेराबद्ध केले.
तो डिलिव्हरी बॉय सिग्नल तोडत सुसाट निघाला
रात्री ८.१५ वाजताची वेळ. तात्या टोपेनगरातील रस्त्यावर व्हेरायटी फूडमधून त्याने फूड पार्सल घेतले. तो लगेच वर्धा रोडकडे देवनगरच्या मार्गाने निघाला. पहिलाच देवनगरचा सिग्नल त्याने तोडला. पुढे विवेकानंदनगर चौक आला. सिग्नल रेड होता. वाहनांची रांग लागली होती. मात्र त्याने वाहनांच्या दाटीवाटीतून दुचाकी काढून सर्वात पुढे आणली. सिग्नलचा लाइट ग्रीन होताच पुन्हा गाडी दामटली. हिंदुस्थान कॉलनी होत गजाननगरच्या मार्गाने, रिंगरोडवरील रेल्वेपुलाखालून तो मानेवाडा रोडच्या दिशेने निघाला. रात्रीची ८ ची वेळ असल्याने या रस्त्यावर भरपूर वाहने होती. वाहनाच्या गर्दीत त्याने ४० ते ५० किलोमीटर वेगाची गती कायम ठेवली होती. नरेंद्रनगरचा सिग्नल तर त्याने सहजच तोडला. तुकाराम सभागृहाजवळील सिग्नललाही तो जुमानला नाही. शताब्दीनगर चौक येईपर्यंत त्याच्या गाडीचा वेग कायम होता. शताब्दीनगर चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तो पुन्हा आपली दुचाकी पुढे करण्यासाठी मार्ग शोधत होता. येथे पर्याय नसल्याने त्याला सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबावे लागले. मात्र ओंकारनगर चौकात पुन्हा सिग्नल ब्रेक केला. मानेवाडा चौकातही वाहनाची गर्दी असल्याने तो थांबला. उदयनगर चौकात त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आणि जानकीनगरकडे दुचाकी वळवीत तिथे कोपऱ्यावर एका घरी फूड डिलिव्हरी दिली. ७ किलोमीटरचे हे अंतर त्याने अवघ्या १५ मिनिटात गाठले.