लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना खरेतर मर्यादा नाहीत. या कल्पनांना मग गणिताच्या सूत्रांची, जीव-भौतिक-रसायन आणि खगोलशास्त्राच्या संकल्पनांची अभ्यासपूर्ण जोड मिळाली की त्यांची भरारी आकाशापलिकडे गवसणी घालते आणि त्यातून निर्माण होते नवे विज्ञान. विद्यार्थ्यांच्या अशाच अभ्यासपूर्ण कल्पनांमधून साकारलेले नवनवे प्रयोग सध्या रमण विज्ञान केंद्रात अनुभवायला मिळत आहेत. सायकलचा उपयोग करून इकोफ्रेंडली वॉशिंग मशीन, सौर ऊर्जेतून सिंचनाचे तंत्र, भूकंपाची पूर्वसूचना देणारे तंत्र, भूकंप आल्यानंतरही इमारत सुरक्षित राहील असे तंत्र, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर, घरगुती स्वच्छता मशीन असे अनेक प्रयोग लक्ष वेधून घेतात. विशेष म्हणजे हे सर्व तंत्रज्ञान प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आपण उपयोगात आणू शकतो, असा विश्वासही हे विद्यार्थी देतात.रमण विज्ञान केंद्र आणि एरोनॉटीकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून केंद्रात ऑरेंज सिटी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही ही अनोखी चलित विज्ञान स्पर्धा आणि शिक्षण सामग्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी एअर व्हाईस मार्शल विजय वानखडे यांच्याहस्ते या मेळाव्याचे औपचारिक उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम, एरोनॉटीकल सोसायटीचे मानद सचिव ग्रुप कॅप्टन राजीव श्रीवास्तव, रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विजय शंकर शर्मा, डॉ. नंदकिशोर करडे, डॉ. हेमंत चांडक प्रामुख्याने उपस्थित होते.मेळाव्यामध्ये नागपूर शहर व आसपासच्या परिसरातील ६३ शाळांच्या ११७ विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व वायु वैमानिक विषयांवरील सिद्धांतावर आधारित प्रतिकृती, मॉडेल्स आणि प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचे मॉडेल्स प्रदर्शनात मांडले आहेत. विशेष म्हणजे १७ शिक्षकांनीही त्यांनी तयार केलेली शिक्षण सामग्री प्रदर्शनात ठेवली आहे. २४ विद्यार्थी व शिक्षकांनी रसायनशास्त्र व आवर्त सारणीच्या विषयावरील तयार केलेली रांगोळी लक्ष वेधून घेत आहे. यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही केले.आपल्या घरगुती उपयोगात येणाऱ्या अनेक वस्तू, पर्यावरण संवर्धनासाठी उपयोगी अनेक प्रयोग विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीतून साकार झाले आहेत. ते प्रयोग प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारे आहेत. विविध शाळेचे विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रेरित करणारे हे प्रदर्शन अनुभवण्याचे आवाहन केंद्राचे विजय शंकर शर्मा, शिक्षक विलास चौधरी व अभिमन्यू भेलावे यांनी केले आहे.
भूकंप सुरक्षित इमारती, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 1:01 AM
सायकलचा उपयोग करून इकोफ्रेंडली वॉशिंग मशीन, सौर ऊर्जेतून सिंचनाचे तंत्र, भूकंपाची पूर्वसूचना देणारे तंत्र, भूकंप आल्यानंतरही इमारत सुरक्षित राहील असे तंत्र, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर, घरगुती स्वच्छता मशीन असे अनेक प्रयोग लक्ष वेधून घेतात.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी घडविले वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन : रमण विज्ञान केंद्रात भरला विज्ञान मेळावा