सुमेध वाघमारे
नागपूर : सरत्या वर्षात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत नियंत्रणात येत नाही तोच डेंग्यू, मलेरियाच्या कहरने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. मागील दोन वर्षांतील हा उच्चांक आहे.
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाली. पूर्वविदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येची व मृत्यूची विक्रमी नोंद झाली. जुलै महिन्यापासून ही लाट नियंत्रणात येत असताना डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले. ऑगस्ट महिन्यापासून या दोन्ही रोगाचे सर्वाधिक रुग्ण दिसून येऊ लागल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले होते.
-डेंग्यूचे मागील वर्षी ५०३, तर यावर्षी ३५९५ रुग्ण
पूर्व विदर्भात २०१९ मध्ये डेंग्यूचे १ हजार ३१६ रुग्ण व ११ मृत्यूची नोंद झाली होती; परंतु २०२० मध्ये रुग्णसंख्येत निम्म्याने घट झाली. ५०३ रुग्ण व २ मृत्यू झाले, असे असताना २०२१ मध्ये सहा पटीने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मृत्यूची संख्या १७ वर पोहोचली.
-मलेरियाचे मागील वर्षी ७,०५१ तर, या वर्षी १०,६९७ रुग्ण
मलेरियाचे २०१९ मध्ये २ हजार ७२८ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली होती. २०२० मध्ये यात वाढ होऊन ७ हजार ५१ रुग्ण व १३ मृत्यू असताना २०२१ मध्ये पुन्हा वाढ होऊन रुग्णसंख्या १० हजार ६९७, वर पोहोचली, तर १४ रुग्णांचे मृत्यू झाले.
-गडचिरोलीत मलेरियाचे, तर नागपुरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण
या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. १० हजार १०० रुग्ण व ८ मृत्यूची नोंद झाली, तर सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. ग्रामीणमध्ये १ हजार २४२ रुग्ण व ५ मृत्यू, तर शहरात १ हजार ५२ रुग्ण व ५ मृत्यू, असे एकूण १ हजार २९४ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली.
:: २०२१ मधील मलेरिया
जिल्हा : रुग्ण व कंसात मृत्यू
भंडारा : ०७
गोंदिया : ४४७ (१)
चंद्रपूर ग्रामीण : १२८(५)
चंद्रपूर शहर : ००
गडचिरोली : १०१०० (८)
नागपूर ग्रामीण : ०७
नागपूर शहर : ०५
वर्धा : ०३
:: २०२१ मधील डेंग्यू
जिल्हा : रुग्ण व कंसात मृत्यू
भंडारा : ५४ (१)
गोंदिया : १७७
चंद्रपूर ग्रामीण : ३२०(४)
चंद्रपूर शहर : २५५
गडचिरोली : ७०
नागपूर ग्रामीण : १२४२ (५)
नागपूर शहर : १०५२ (५)
वर्धा : ४१५ (२)
::पूर्व विदर्भातील मलेरिया
२०१९ : २७२८ रुग्ण : ६ मृत्यू
२०२० : ७०५१ रुग्ण : १३ मृत्यू
२०२१ : १०६९७ रुग्ण :१४ मृत्यू
::पूर्व विदर्भातील डेंग्यू
२०१९ : १३१६ रुग्ण : ११ मृत्यू
२०२० : ५०३ रुग्ण : ०२ मृत्यू
२०२१ : ३५९५ रुग्ण : १७ मृत्यू