सुमेध वाघमारे
नागपूर : पूर्व विदर्भातडेंग्यू रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. मागील चार वर्षांत डेंग्यूचे ६ हजार ६४६ रुग्ण आढळून आले. यातील ४८ रुग्णांचा जीव गेला. मागील वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्यांनी वाढ झाली. सहा जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यामुळे आतापासून उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.
डेंग्यूचा एक डास सुमारे १५०० डासांना जन्म घालतो. दुसऱ्यांदा डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त गंभीर होतो. मात्र, जुन्या चुकांमधून धडा घ्यायला कुणीच तयार नाही. डेंग्यू डासांना समूळ नष्ट करण्याची जबाबदारी सर्वांची असताना, केवळ आरोग्य विभागावर जबाबदारी ढकलली जात आहे. पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यांत २०१८ मध्ये १ हजार १९९ रुग्ण व ११ मृत्यू, २०१९ मध्ये १ हजार ३१६ रुग्ण व ११ मृत्यू, २०२० मध्ये ५०३ रुग्ण व २ मृत्यू, तर मागील वर्षी सर्वाधिक ३ हजार ६२८ रुग्ण व २४ मृत्यूची नोंंद झाली.
- नागपूर जिल्ह्यात २,३०८ रुग्ण, ९ मृत्यू
सहा जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. २०१८ मध्ये ६६८ रुग्ण व २ मृत्यू, २०१९ मध्ये ७२५ रुग्ण व ५ मृत्यू, २०२० मध्ये १६१ रुग्ण व २ मृत्यू, तर २०२१ मध्ये २ हजार ३०८ रुग्ण व ९ मृत्यू झाले.
- चंद्रपूर दुसऱ्या स्थानी
डेंग्यू रुग्णांच्या प्रकरणात पहिल्या स्थानी नागपूर, तर दुसऱ्या स्थानी चंद्रपूर जिल्हा आहे. २०२१ मध्ये या जिल्ह्यात ५९१ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली. त्या खालोखाल वर्धा जिल्ह्यात ४१८ रुग्ण व ३ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात १८६ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात ७० रुग्ण व २ मृत्यू, तर भंडारा जिल्ह्यात ५५ रुग्ण व २ मृत्यूची नोंंद झाली. मागील चार वर्षांत या सहाही जिल्ह्यांमध्ये रुग्ण व मृत्यूची संख्या वाढताना दिसून येत आहे.
- मागील चार महिन्यांत केवळ १७ रुग्ण
पावसाला सुरुवात होताच डेंग्यू रुग्णांत वाढ होते. मागील वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. नंतर रुग्ण कमी होत गेले. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत पूर्व विदर्भात केवळ १७ रुग्णांची नोंद झाली. यात एकही मृत्यू नाही. गोंदिया व वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. मात्र, नागपूर जिल्ह्यात ११, तर चंद्रपूर जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले.