लोकमत विशेष
आनंद शर्मा
नागपूर : खासगी क्षेत्राच्या रेल्वेगाड्या चालविण्याच्या दिशेने रेल्वे बोर्डाने एक पाऊल पुढे टाकले आहे. शुक्रवारी नागपूर-मुंबई, अकोला-मुंबई मार्गासह इतर संबंधित मार्गांसाठी रेल्वे बोर्डाने मागील वर्षी मागविलेल्या निविदेचे अर्ज उघडले. या अर्जांचे मूल्यांकन केल्यानंतर निवड केलेल्या कंपनीला रेल्वे बोर्ड खासगी रेल्वेगाड्या चालविण्यासाठी हिरवी झेंडी देणार आहे.
देशाच्या १२ रेल्वे कल्स्टरमध्ये खासगी रेल्वे चालविण्यासाठी मागील वर्षी रेल्वे बोर्डातर्फे खासगी संस्थांकडून मागविण्यात आलेल्या अर्जाशी संबंधित इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते जमा करण्याची अखेरची तारीख ८ सप्टेंबर २०२० ठरविली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये संबंधित खासगी संस्थांची शॉर्ट लिस्ट जारी करण्यात आली. या यादीत मुंबई १ समूहात प्रस्तावित मुंबई-नागपूर, मुंबई-अकोलासह संबंधित मार्गाच्या १६ खासगी रेल्वेगाड्यांसाठी बोली लावणाऱ्या आठ कंपन्यांचा समावेश होता. यात क्युब हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., गेट वे रेल फ्रेट लि. व गेट वे डिस्ट्रिपार्क लि. चे समूह, जीएमआर हायवेज लि., इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन लि., आरआयबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि., मलेमपति पॉवर प्रा. लि. व टेक्नो इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा. लि. चे समूह, मेघा इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. आणि वेलस्पन इंटरप्रायजेस लि. चा समावेश होता. परंतु कोरोनामुळे आणि इतर कारणांमुळे बोली उघडण्याच्या प्रक्रियेला जवळपास चार महिने उशीर झाला. आता शुक्रवारी रेल्वे बोर्डाच्या वतीने या कंपन्यांच्या बोली उघडण्यात आल्या आहेत. बोलींचे मूल्यांकन केल्यानंतर संबंधित कंपनीला खासगी रेल्वे चालविण्याबाबत रेल्वे बोर्ड अंतिम निर्णय घेणार आहे. त्यासाठी किती वेळ लागेल हे आताच सांगणे शक्य नाही. देशभरातील १२ समूहात साकारणाऱ्या खासगी रेल्वेच्या संचालनाच्या प्रकल्पाची एकूण किंमत ७ हजार २०० कोटी रुपये ठरविली असल्याची माहिती आहे. ४० मॉडर्न रॅकसह या २९ जोडी रेल्वे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) आणि डिझाईन, बिल्ड, फायनान्स आणि ऑपरेट (डीबीएफओ) तत्वावर खासगी संस्थांतर्फे चालविण्यात येणार आहे.
.....................
खासगी रेल्वेसाठी आलेले अर्ज उघडण्यात आले- ‘खासगी रेल्वेच्या संचालनाच्या प्रकल्पासाठी रेल्वे बोर्डाने काढलेल्या निविदेसाठी खासगी व शासकीय संस्थांकडून मिळालेले अर्ज शुक्रवारी उघडण्यात आले. यात मुंबई १ क्लस्टर अंतर्गत मुंबई-नागपूर आणि अकोला-नागपूर मार्गावरील खासगी रेल्वेसाठी आलेल्या अर्जांचाही समावेश आहे. त्यांचे मूल्यांकन केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.’
-डी. जे. नारायण, सहायक महासंचालक (पीआर), रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली
............