नागपूर : श्रावणात आता रानभाज्या उगवायला लागल्या आहेत. निसर्गाचा हा ठेवा लक्षात घेऊन आता जागृतीसाठी रानभाजी महोत्सवही व्हायला लागले आहेत. वर्षातून काही काळापुरत्याच उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या म्हणजे निरोगी जीवनासाठी निसर्गाची भेटच आहे.
रानभाज्या या पूर्णत: नैसर्गिक आणि रसायनमुक्त असतात. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर खनिजे, जीवनसत्त्वे असतात. अनेक रोगांवर त्या गुणकारी असतात. पहिल्या पावसासोबत त्या ठराविक काळात उगवतात. श्रावण महिन्यापर्यंत वाढतात. पुढे हळूहळू उगवायच्या थांबतात.
नागपूर जिल्ह्यात साधारणत: उतरण, काटवल (कर्टुले), माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, तरोटा, केना, धानभाजी, टेकाडे, पकानवेल, भशेल पानवेल, बांबू वास्ते, भराटी, मटारू, रानमटारू, सुरण, रानकोचई, वाघोटी, दिंडा, वडवांगे, माठ, आघाडा, घोळ, चिवळ, धोपा, शेरेडिरे, खापरखुटी (पुनर्नवा) आदींसह ४० प्रकारच्या भाज्या आढळतात.
...
या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?
खापरखुटी (पुनर्नवा) - आयुर्वेदात पुनर्नवा असे नाव. शरीराला नवचैतन्य देते.
कुडा : या आयुर्वेदिक औषधात कुड्याच्या मुळावरील सालीचा वापर. पोटदुखी, हगवण यावर उपयोगी. याच्या बियांना इंद्रजव म्हणतात. कामशक्ती वाढविण्यासाठीच्या औषधात वापर.
कुरडू : तणभाजी असून, शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. दमा, श्वसनरोगात लाभदायक. श्रावणात सर्वांनी खावी.
आघाडा : तणभाजी असून, कडू व पाचक असते. उष्णता कमी करून लघवीतील आम्लता दूर करते.
चुक्का : उष्णतेचे विकार घालवून पचनक्रिया सुधारते. सूज उतरविते, रक्तदोष दूर करते.
केणा : त्वचाविकार घालविते, सूज उतरविते, पचनक्रिया सुधारून पोट साफ करते.
...
२) या रानभाज्या झाल्या गायब
सुरंग : हा जमिनीत वाढणारा कंद आहे. यात उत्तम प्रोटिन्स असून, शरीरातील निरुपयोगी आणि विषारी केमिकल्स घालविते.
मटारू : यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. वेलीवर फळे येतात. भाजी करून तसेच भाजूनही खाता येतात. महिलांच्या आजारात गुणकारी.
...
३) शक्तिवर्धक रानभाज्या (कोट)
सर्वच रानभाज्या दुर्मीळ आहेत. त्यात खनिजे भरपूर असल्याने आरोग्यदायी आहेत. अनेक भाज्यांबद्दल गैरसमजही आहेत. ते प्रबोधनातून दूर करण्याची गरज आहे.
-डॉ. देवानंद पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता, पं.कृ.वि. नागपूर
...