नागपूर : उन्हाळा येताच वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, बर्फ गोळा यासारख्या थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी वाढली आहे. प्रत्येक ज्यूस सेंटर व विक्रीच्या दुकानावर बर्फ हा लागतोच. परंतु, या दुकानांमध्ये येणारा बर्फ नेमका कुठून येतो याची तपासणी कुणीही करीत नाही. अन्न व औषध प्रशासनालाही याची चाचपणी करावी, असे वाटत नाही. त्यामुळे शीतपेय, गोळ्यांसाठी वापरण्यात येणारा बर्फ चांगल्या दर्जाचा आहे का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. शिवाय बर्फ गोळा विकणाऱ्यांचा परवाना कुणी तपासतो का, असाही गंभीर प्रश्न आहे.
अशुद्ध पाण्याचा बर्फ बिघडवू शकतो आरोग्य
अशुद्ध पाण्याचा बर्फ निश्चितच आरोग्य बिघडवू शकतो. अशुद्ध पाण्यापासून तयार होणाऱ्या बर्फामुळे पोटाचा त्रास, सर्दी, ताप, खोकला होण्याची जास्त शक्यता असते. या व्यवसायाशी जुळलेले लोक साखरेऐवजी सॅक्रिनचा जास्त उपयोग करतात. त्यामुळे धोका जास्त वाढतो. तसेच बर्फ गोळा आणि आइसस्क्रीमला गोडवा आणण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलचाही वापर करतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
परवाना असेल तिथेच खा बर्फाचा गोळा
नागपुरात बर्फ गोळा विकणाऱ्यांकडे परवाना नाही. विक्रेते हे हंगामी व्यवसाय करणारे असतात. त्यामुळे ते परवाना काढण्याचा भानगडीत पडत नाहीत. विक्रेत्यांच्या हातठेल्याच्या दर्शनी भागात परवानाचा फोटो नसतोच. नागपूरकर परवाना नसलेल्या हातठेल्यावर बर्फाचा गोळा खाऊन आजाराला आमंत्रण देत आहे.
खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा रंग निळा
खाण्यायोग्य बर्फाचा रंग पांढरा आणि पारदर्शक असतो. तर खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा रंग निळा असतो. निळ्या रंगाचा बर्फ कारखान्यांमध्ये उपयोगात येतो. खाण्याचा बर्फ हा शुद्ध पाण्यापासूनच तयार झालेला असावा.
गतवर्षी बर्फ विक्रेत्यांची तपासणी
गेल्यावर्षी बर्फ गोळा विक्रेत्यांची तपासणी केल्याची माहिती आहे; परंतु त्यांच्यावर ठोस कारवाई झालीच नाही. नागपुरात जवळपास २०० पेक्षा जास्त हातठेल्यांवर बर्फ गोळ्यांची विक्री केली जाते. यंदा तपासणी करण्याची लोकांची मागणी आहे.
अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे बर्फ गोळा विक्रेत्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान परवाना नसलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परवाना काढण्यासाठी त्यांना बाध्य करण्यात येणार आहे.
उन्हाळ्यात लहान मुले दरदिवशी बर्फाचा गोळा खातात. ते आरोग्यासाठी घातक आहे. अशुद्ध पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचा गोळा सेवनाने गळ्याला संसर्ग होऊन अनेक आजार होऊ शकतात. बर्फाचा गोळा आणि आइसस्क्रीम विकणारे अनेकदा दूषित पाण्याचा उपयोग करतात. विक्रेत्यांना अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे.
विनापरवान्या बर्फ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मोहीम लवकरच राबवू.
-सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभाग