प्रदूषणाला आळा : देशातील पहिलाच प्रयोग जीवन रामावत नागपूरआज भारतासह संपूर्ण जगाला पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. यावर प्रत्येकजण चिंता व्यक्त करीत असताना, महाराष्ट्र राज्य वीज उत्पादन कंपनी(महाजनको)ने कोराडी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इको-फ्रेन्डली ‘सुपर क्रिटिकल’ वीज प्रकल्प उभारून पर्यावरण संरक्षणात आपले योगदान दिले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित १८९० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा नुकताच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या प्रकल्पासोबतच ‘महाजनको’ला देशात ‘सुपर क्रिटिकल’ प्रकल्प उभारण्याचा पहिला मान मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी हेमा देशपांडे यांच्या मते, पूर्वी वीज प्रकल्पामधून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या धुरात १५० मिलिग्रॅमपर न्यूटन मीटर क्युबपेक्षा जास्त धुळीचे कण नसावे, असे बंधन होते. यानंतर ते प्रमाण १०० मिलिग्रॅमपर न्यूटन मीटर क्युबपर्यंत कमी करण्यात आले होते. शिवाय अलीकडेच कोराडी येथे सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी ५० मिलिग्रॅमपर न्यूटन मीटर क्युबचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार या नवीन ‘सुपर क्रिटिकल’ तंत्रज्ञानामुळे वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यात मदत होणार आहे. महाजनकोने या नवीन प्रकल्पासाठी १७० मीटर उंचीचे तीन ‘कूलिंग टॉवर’ उभारले आहेत. या टॉवरमधून प्रकल्पातील वाफ बाहेर फेकल्या जाणार आहे. परंतु त्यातून वातावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे महाजनकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उपलब्ध माहितीनुसार, हा नवीन प्रकल्प एकूण १७२ हेक्टर जागेत उभारण्यात आला आहे. शिवाय या प्रकल्पासाठी वार्षिक ९.१ मिलियन मेट्रिक टन म्हणजे, प्रतिदिन २५ हजार मेट्रिक टन कोळसा लागणार आहे. महाजनको हा सर्व कोळसा छत्तीसगड येथील गरे पालमा-२ या खाणीतून घेणार आहे.कोराडी येथे एकूण १० वीज संच आहेत. मात्र त्यापैकी सध्या १ ते ५ क्रमांकाचे पाच संच बंद असून, अन्य पाच संच सुरू आहेत. बंद असलेले सर्व संच २५ ते ३० वर्षे जुने झाले आहेत. त्यापैकी पहिला संच हा जून १९७४ मध्ये सुरू करण्यात आला होता. तसेच दुसरा संच हा मार्च १९५५ मध्ये, तिसरा मार्च १९७६ मध्ये आणि चौथा संच हा जुलै १९७६ मध्ये सुरू करण्यात आला होता. या चारही संचांची वीज उत्पादन क्षमता ही प्रत्येकी १५० मेगावॅट होती. यानंतर जुलै १९७८ मध्ये २०० मेगावॅट क्षमतेचा पाचवा संच सुरू करण्यात आला. मार्च १९८२ मध्ये २१० मेगावॅट क्षमतेचा सहावा आणि जानेवारी १९८३ मध्ये २१० मेगावॅट क्षमतेचा सातवा संच येथे सुरू करण्यात आला होता. या सर्व वीज संचातून मागील २५ ते ३० वर्षे सतत वीज उत्पादन झाले. परंतु आता ते जुने झाल्याने त्यांची देखभाल व दुरुस्तीमुळे त्यांच्यावरील खर्च वाढला आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून १ ते ५ क्रमांकाचे संच बंद करण्यात आले आहेत. शिवाय सहाव्या संचाच्या नूतनीकरणाचे काम प्रगतिपथावर असून, सद्यस्थितीत सातव्या संचासह नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या नवीन तीन संचातून वीज उत्पादन सुरू आहे. सांडपाण्यापासून वीज निर्मिती आतापर्यंत नागपुरातील संपूर्ण सांडपाणी नागनदीतून थेट गोसेखुर्द प्रकल्पापर्यंत वाहून जात होते. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु आता त्याच पाण्याचे कोराडी येथील या ‘सुपर क्रिटिकल’ वीज प्रकल्पात वीज निर्मितीसाठी उपयोग केला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा देशातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे. कोराडी येथील वीज प्रकल्पासाठी पेंच प्रकल्पातील पाण्याचा उपयोग केला जातो. परंतु आता शहरातील सांडपाण्यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करून, ते येथील वीज प्रकल्पात पोहोचविले जात आहे. यामुळे पेंचमधील शुद्ध पाण्याची फार मोठी बचत होणार असून, ते नागपूरकरांना पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. काय आहे, ‘सुपर क्रिटिकल’ तंत्रज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोराडी येथील या ‘सुपर क्रिटिकल’ वीज प्रकल्पाचा शुभारंभ झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात ‘सुपर क्रिटिकल’ वीज प्रकल्प म्हणजे काय? असा प्रश्न घोंगावत आहे. शिवाय त्याविषयी अनेकांच्या मनात एक उत्सुकता आहे. त्यानुसार ‘लोकमत’ने वीज क्षेत्रातील तज्ज्ञ आणि महाजनकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी या ‘सुपर क्रिटिकल’ तंत्रज्ञानाचे गुपित उलगडले. वीज तज्ज्ञांच्या मते, ‘सुपर क्रिटिकल’ हे जपानमधील तंत्रज्ञान आहे. त्यानुसार कोराडी येथे उभारण्यात आलेल्या तिन्ही वीज संचामध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या ‘सुपर क्रिटिकल’ वीज प्रकल्पामध्ये सामान्य प्रकल्पाच्या तुलनेत कोळसा व पाण्याची फार मोठी बचत होते. शिवाय या अत्याधुनिक वीज प्रकल्पात ‘बॉयलर ड्रम’ नसतो. त्याचवेळी कोळसा हा कमी लागत असल्याने प्रकल्पातून बाहेर पडणारी राखसुद्धा कमी असते आणि पर्यायाने प्रकल्पातून होणारे वायू आणि जलप्रदूषण कमी होते.
इको-फ्रेन्डली ‘सुपर क्रिटिकल’ प्रकल्प
By admin | Published: April 16, 2017 1:32 AM