लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘सॅनिटरी पॅड्स’बाबत जनजागृती वाढत असतानाच त्याची शास्त्रशुद्धपणे विल्हेवाट लावण्याचे आव्हानदेखील समोर उभे ठाकले आहे. या ‘पॅड्स’मध्ये असणारे प्लास्टिक पर्यावरणाला घातक असते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून ‘नीरी’ने इतर सहयोगी संस्थांसोबत मिळून विधायक संशोधन केले आहे. ‘सॅनिटरी पॅड्स’ची ‘इकोफ्रेंडली’ विल्हेवाट लावण्यासाठी ‘ग्रीनडिस्पो’ नावाचे यंत्र तयार केले असून, यात पर्यावरणाची हानी न होता ‘पॅड्स’ जाळल्या जाऊ शकणार आहेत.‘सीएसआयआर-नीरी’, ‘एआरसीआय-हैदराबाद’ आणि ‘स्नोबॉल एरोथर्मिक्स’ यांनी संयुक्तपणे ‘ग्रीनडिस्पो’ची निर्मिती केली आहे. ‘सीएसआयआर-नीरी’तील पर्यावरण अभियांत्रिकी व ‘गॅस एमिशन कंट्रोल’मधील तज्ज्ञता, ‘एआरसीआय’चे ‘सिरॅमिक प्रोेसेसिंग’ आणि ‘स्नोबॉल एरोथर्मिक’चे ऊर्जा वाचविणारे ‘डिझाईन’ यांच्या एकत्रीकरणातून हे संशोधन झाले. ‘एआरसीआय’चे संचालक डॉ. जी. पद्मनाभन आणि ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या उपस्थितीत ‘ग्रीनडिस्पो’चे लोकार्पण करण्यात आले.‘सॅनिटरी पॅड्स’मधील प्लास्टिक नष्ट व्हायला अनेक वर्षे लागतात, शिवाय त्यात अशुद्ध रक्त असते. त्यामुळे पर्यावरण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.असे काम करते ‘ग्रीनडिस्पो’‘ग्रीनडिस्पो’मध्ये विशिष्ट प्रकारचे ‘हिटर्स’ देण्यात आले आहेत. यात ‘पॅड्स’ जाळण्याची सुविधा असून, यातील वायूंचे उत्सर्जन होऊ नये यासाठी ‘हिटिंग चेंबर’चे तापमान १०५० अंश सेल्सिअसपर्यंत नेण्याची सुविधा आहे. ‘ग्रीनडिस्पो’मध्ये ‘पॅड्स’चे पूर्णत: दहन होते व उत्सर्जनदेखील अत्यल्प प्रमाणात होते, अशी माहिती ‘एआरसीआय’चे सहयोगी संचालक डॉ. रॉय जॉन्सन आणि ‘नीरी’च्या ‘ऊर्जा व संसाधन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन लाभसेटवार यांनी दिली.दर महिन्याला ४०० मिलियन ‘पॅड्स’ कचऱ्यातप्राप्त आकडेवारीनुसार दर महिन्याला देशभरात ४०० मिलियन ‘पॅड्स’ हे कचºयात फेकण्यात येतात आणि त्यांची विल्हेवाट लावणे ही समस्याच आहे. या ‘पॅड्स’मुळे पर्यावरणासह आरोग्यालादेखील धोका असतो, सोबतच पाण्याचा निचरा करणाºया पाईपलाईनदेखील ‘चोक’ होतात. या सर्वांवर ‘ग्रीनडिस्पो’च्या माध्यमातून तोडगा निघू शकतो. अशाप्रकारचे संशोधन जास्तीतजास्त प्रमाणात व्हायला हवे, असे मत ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी व्यक्त केले. ‘ग्रीनडिस्पो’ तयार करण्यात आल्यानंतर त्याची ‘नीरी’मध्ये सखोल तपासणी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये येथे हे यंत्र फायदेशीर ठरू शकते, असे प्रतिपादन व्ही.व्ही.एस. राव यांनी केले.
नागपुरात ‘सॅनिटरी पॅड्स’ची ‘इकोफ्रेंडली’ विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:21 PM
‘सॅनिटरी पॅड्स’बाबत जनजागृती वाढत असतानाच त्याची शास्त्रशुद्धपणे विल्हेवाट लावण्याचे आव्हानदेखील समोर उभे ठाकले आहे. या ‘पॅड्स’मध्ये असणारे प्लास्टिक पर्यावरणाला घातक असते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून ‘नीरी’ने इतर सहयोगी संस्थांसोबत मिळून विधायक संशोधन केले आहे. ‘सॅनिटरी पॅड्स’ची ‘इकोफ्रेंडली’ विल्हेवाट लावण्यासाठी ‘ग्रीनडिस्पो’ नावाचे यंत्र तयार केले असून, यात पर्यावरणाची हानी न होता ‘पॅड्स’ जाळल्या जाऊ शकणार आहेत.
ठळक मुद्दे‘नीरी’ने घडविले ‘ग्रीनडिस्पो’: पर्यावरणाची हानी न होता जाळू शकणार ‘पॅड्स’