लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत आपली बसच्या तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु हे वास्तव आहे, या कालावधीत तिकीट तपासणी करणाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नव्हता. अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर परिवहन समितीच्या पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करता येत नव्हता. वास्तविक तीन डिझेल ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयबीटीएम ऑपरेटर दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रांजिट सिस्टीम्स लिमिटेड(डिम्ट्स)चे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.एप्रिल महिन्यात तिकिटापासून दररोज ११ ते १९ लाखांचे उत्पन्न झाले. मात्र अनेक दिवस असे होते की त्या दिवसाला उत्पन्न कमी व्हायला नको होते.२२ जानेवारी २०१९ रोजी आपली बसच्या भाड्यात २५ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेला दररोज १२ ते १६ लाखांचा महसूल मिळत होता. तिकीट दर वाढविल्यामुळे उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु त्यानंतरही उत्पन्न वाढले नाही. आचारसंहिता कालावधीतील उत्पन्नाची आकडेवारी बघितली तर यात सतत चढउतार असल्याचे निदर्शनास येते.मतदानादरम्यान १० व ११ एप्रिलला बसेस निवडणुकीच्या कामात होत्या. या दिवशी बसचे उत्पन्न कमी होणे अपेक्षितच होते. परंतु त्यानंतरच्या दिवसात कमी उत्पन्न झाले आहे. याची दखल घेत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिम्ट्सला पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले. मात्र डिम्ट्सने २२ एप्रिलला पत्राला उत्तर पाठवून उत्पन्नावर परिणाम झाला नसल्याचे सांगितले.विशेष म्हणजे काही मार्गावरील बसेसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यानंतरही प्रवाशांची संख्या १.४५ लाखापर्यंतच पोहचली आहे. डिम्ट्सच्या तिकीट निरीक्षकांच्या भूमिकेवर परिवहन समितीने अनेकदा आक्षेप नोंदविला. समितीतर्फे गठित भरारी पथकांनी धाडी घातल्यानंतर दररोजच्या उत्पन्नात २ ते ३ लाखांनी वाढ झाली होती. मात्र कारवाई थांबताच उत्पन्नातही घट झाली.दोन वर्षानंतरही मार्गांच्या उत्पन्नाचे निर्धारण नाहीदिल्लीसह देशभरातील मोठ्या शहरात मार्गांच्या आधारावर बसच्या उत्पन्नाचे निर्धारण केले जाते. यासाठी आठवड्यातील सात दिवस एक पथक बसमधून प्रवास करून तिकीट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाची वास्तव माहिती गोळा करतात. त्याआधारे मार्गावर होणाऱ्या उत्पन्नाचे निर्धारण केले जाते. दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बससेवा सुरू केली. डिम्ट्सकडे बस नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु डिम्ट्सने अद्याप मार्गाच्या आधारावर उत्पन्नाचे निर्धारण केलेले नाही. यामुळे तिकिटापासून होणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.डिम्ट्सचे स्पष्टीकरणातील मुद्दे
- शहर बसच्या तिकीटदरात सहा महिन्यापूर्वी नव्हे तर तीन महिन्यापूर्वी वाढ करण्यात आली. उत्पन्नात घट झालेली नाही.
- १ ते १६ एप्रिल दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६६ बसेस(१८ टक्के) बसेस कमी धावल्या. किलोमीटरमधील अंतरही कमी आहे.
- १० व ११ एप्रिलला २४२ बसेस निवडणुकीच्या कामात होत्या. या दिवसाला बसेस मोजक्याच धावल्या.
- एकूण उत्पन्नात ३ टक्के वाढ झालेली आहे. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.