नागपूर : केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील या धोरणांबाबत असमाधान व्यक्त केले आहे. देशाची आर्थिक गती मंदावली असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्राची कानउघाडणी केली आहे.रेशीमबाग मैदान येथे शनिवारी सकाळी झालेल्या संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवप्रसंगी डॉ. मोहन भागवत बोलत होते. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीदेखील यावेळी उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, आर्थिक क्षेत्रात आपण ज्याप्रकारे पुढे जात आहोत, संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे आहे. देशाची आर्थिक विकासाची गती मंदावली, असे म्हणतात. ती ठीक होईल, असे देखील वाटते. मात्र भविष्य लक्षात घेता पारंपरिक आर्थिक विचारसरणीतून बाहेर आले पाहिजे. यासंदर्भात समाजाच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, हेही जाणून घेतले पाहिजे. स्वदेशीला बळ दिले पाहिजे. या बाबींचा निती आयोग व धोरण निर्मात्यांनी विचार करावा, असा सल्लाही डॉ.भागवत यांनी दिला. केंद्र शासनाने भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलत काही धाडसी निर्णय नक्कीच घेतले. मात्र उद्योग, व्यापार, कृषी यांच्यासोबतच मोठे, लघु, मध्यम उद्योग, कामगार क्षेत्र यांचे हित लक्षात घेऊन सर्वसमावेशक आर्थिक धोरण लागू करण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले. सामान्य जनतेचा विचार करून राबविल्या जाणाºया योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासायला हवे. लघु, कुटीर व मध्यम उद्योगांमुळे कठीण काळात देखील अर्थव्यवस्था तरली. त्यामुळे या उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मितीसाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच विविध योजना व कामांची गती वाढविली पाहिजे, असेही ते म्हणाले.
देशाची आर्थिक गती मंदावली, सरसंघचालकांनी केली केंद्राची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 3:37 AM