नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २१ लाखांच्या लूटमारीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या हवाला व्यवहाराकडे ईडी (इन्फोसमेंट डिरोक्टेरेट) आणि आयटी (इन्कम टॅक्स) यांचेही लक्ष वेधले गेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन्ही तपास यंत्रणांच्या वरिष्ठांशी संपर्क करून तपासातून हवालाची पाळेमुळे खोदण्याचे प्रयत्न चालविले आहे. त्यामुळे हवाला व्यवसायात गुंतलेल्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नागपूर हे मध्य भारतातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे हवाला केंद्र आहे. येथे छोटे-मोठे शंभरावर हवाला व्यावसायिक आहे. मिठाई, महागडे चॉकलेट, मेडिसिन बॉक्स वापरून ही मंडळी दूरदूरपर्यंत दरदिवशी कोट्यवधींची रोकड पोहोचवतात. विशेष म्हणजे, छोट्या मोठ्या शहरात ही मंडळी कार आणि दुचाकीचा वापर करून रकमेची हेरफेर करतात. ५० लाखांपर्यंतची रक्कम दुचाकीच्या डिक्कीतूनच इकडची तिकडे केली जाते. शनिवारी (दि. २५) अशीच २१ लाखांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत घेऊन जाताना कुख्यात गुंड विकी रमाकांत बारापात्रे, व्यंकटेश उर्फ गोलू कोहाड आणि उमेश श्रीराम सोनकुसरे या तिघांनी चाकूच्या धाक दाखवून लुटली.
दिवसाढवळ्या झालेल्या या लूटमारीच्या तपासावर खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त लोहित मतानी नजर ठेवून असून, लकडगंज पोलिसांनी आतापावेतो पडद्यामागे राहून गुन्ह्यात सहभागी असलेल्या टिपर, कॅशरिसिव्हरसह पाच आरोपींना पकडले आहे. त्यांच्याकडून १६ लाख रुपये जप्तही केले आहेत. हा तपास करतानाच हवालाच्या कोट्यवधींचा व्यवहार आणि इतर काही संशयास्पद तसेच संवेदनशील मुद्दे अधोरेखित झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. पुढच्या काही तासांत ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना हवाल्याशी जुळलेल्या बाबी कळविण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणा समांतर तपास करणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्याचे संकेत मिळाल्यामुळे हवाला बाजार अस्वस्थ झाला आहे.
वाहनांमध्येच विशिष्ट लॉकर
हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड इकडून तिकडे नेण्यासाठी कार आणि अन्य वाहनांना विशिष्ट स्वरूपाचे लॉकर (कप्पे) बनवून घेतात. बाह्यदर्शी कुणाच्या ते लक्षातही येत नाही. रायपूरहून नागपुरात साडेपाच कोटींची रोकड घेऊन येणाऱ्या डस्टर कारला २०१८ मध्ये नंदनवन पोलिसांनी पकडले होते. ही कारवाई करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने दोन पोलीस कर्मचारी आणि दोन कुख्यात गुन्हेगारांच्या माध्यमातून अडीच कोटींची रोकड जप्त केली होती. त्यावेळी डस्टरमध्ये बनविण्यात आलेले छुपे लॉकर (कप्पे)ही उजेडात आले होते.
----