जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई आणि विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एमडी तस्करांना कंट्रोल करणारी मुंबईतील चर्चित हिना खान ऊर्फ शाहविरुद्ध ईडीने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट(पीएमएलए)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मादक पदार्थ तस्करीत सामील विदर्भातील कुण्या टोळीविरुद्ध पहिल्यांदाच याप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. यात हिना व तिच्या चार साथीदारांची नावे आहेत.
हिना चार वर्षांपासून एमडी तस्करी करीत आहे. यशोधरानगर येथील निवासी शाहरुख खान हा एमडी तस्कर आहे. पोलिसांचे त्याच्यावर लक्ष असल्याने तो दोन वर्षांपूर्वी मुंबईला निघून गेला होता. तिथे तो हिनाच्या संपर्कात आला. हिनासोबत मुंबईचा आमीर, यशोधरानगर येथील आमीर आणि पक्या ऊर्फ शहनवाजच्या मदतीने विदर्भात एमडीचा पुरवठा करू लागला. कमी कालावधीतच हिना व शाहरुखने एमडी तस्करीला कंट्रोल केले. सहा महिन्यापूर्वी शहर पाेलिसांच्या एनडीपीएस सेलची नजर हिना व शाहरुखवर गेली. ते पोलिसांपासून वाचण्यासाठी कुरियरने एमडी नागपूरला पाठवीत होते. पाेलिसांनी २.५६ ग्रॅम एमडीसोबत त्यांच्या दोन साथीदारांना पकडले. याच्या काही दिवसानंतरच हिना व शाहरुखच्या साथीदारांना पुन्हा १३५ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले. चार महिन्यातच ४० लाखाची एमडी व सहा आरोपी पकडल्या गेल्यामुळे एनडीपीएस सेलने हिना-शाहरुखची पूर्ण कुंडलीच बाहेर काढणे सुरू केले. दोन वर्षांपूर्वी दाखल ७.५० लाख रुपयाच्या एमडी जप्तीमध्ये हिना खानचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. एनडीपीएस सेलने हिनाला पकडण्यासाठी मुंबईत दोनवेळा जाळ पसरविले. परंतु ती हाती लागली नाही. हिनाचे मुंबई-विदर्भासह अनेक जिल्ह्यात नेटवर्क असल्याची माहिती होताच ईडी (प्रवर्तन निदेशालय)सुद्धा कामाला लागले. मादक पदार्थ तस्करी रोखण्यासाठी त्यांनी हिना-शाहरुख आणि त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध पीएमएलएअंतर्गत गुन्हा दाखल केला.
सूत्रानुसार हिना ही १९७० च्या दशकातील प्रसिद्ध संगीतकाराची नात आहे. हिना शाह ऊर्फ खान मुंबईत ब्युटी पार्लर चालवीत होती. यादरम्यान हायप्रोफाईल पार्टी व श्रीमंत लोकांच्या संपर्कात आल्याने तिला एमडीची सवय लागली. ती मुंबईच्या नाईट पार्टीमध्ये एमडीचा पुरवठा करू लागली. यादरम्यान शाहरुख तिच्या संपर्कात आला. शाहरुख हा विदर्भातील अनेक एमडी तस्करांशी जुळला आहे. त्याने हिनाला नागपूरला आणून आपले नेटवर्क दाखविले. यानंतर हिना, शाहरुख आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने विदर्भातही एमडीचा पुरवठा होऊ लागला.
बॉक्स
नागपूर अडीच वर्षात बनले केंद्र
नागपुरात एमडीची सुरुवात सप्टेंबर २०१८ पासून सुरू झाली. एनडीपीएस सेलची पहिली कारवाई झाली तेव्हा केवळ दोन ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली होती. अडीच वर्षात नागपूर एमडी तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. सट्टेबाज, जुगारी, श्रीमंत घरातील युवक-युवती मोठ्या संख्येने एमडीच्या जाळ्यात अडकले आहेत. दररोज लाखो रुपयाची एमडी वेगवेगळ्या मार्गाने नागपूरला पोहोचते. शहर पोलिसांनीही याविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात कोत्तुलवार टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार एनडीपीएस सेल एमडी तस्करांविरुद्ध मोहीम राबवीत आहे.