जगदीश जोशी
नागपूर : १८ महिन्यात दुप्पट रक्कम परत करण्याची बतावणी करून ३५ कोटी रुपयांनी फसवणूक करून फरार झालेल्या कोल्हे बंधूंविरुद्ध ईडीने कंबर कसली आहे. ईडीच्या स्थानिक शाखेने कोल्हे बंधू आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध ईसीआयआर (इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल केला आहे. सहा महिन्यांपासून आर्थिक शाखा कोल्हे बंधू आणि त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहे.
सुशील कोल्हेने आपला भाऊ पंकज कोल्हे, साथीदार भरत साहू आणि इतर व्यक्तींच्या मदतीने २०१८ मध्ये सिव्हिल लाइन्समध्ये एजीएम कार्पोरेशन तसेच एजीएम डिजिटल लिमिटेडचा शुभारंभ केला. त्या माध्यमातून नागरिकांना डिजिटल जाहिरातीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करण्यात येत होते. पहिली स्कीम १८ महिन्यात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट देण्याचे आणि दुसऱ्या स्कीममध्ये ४० महिन्यांपर्यंत दर महिन्याला २.५ टक्के मूळ रक्कम परत करण्याचे आणि २.५ टक्के व्याज देण्याचे आमिष दिले. गुंतवणुकदारांना प्रभावित करण्यासाठी कोल्हे बंधू लाखो रुपये खर्च करून हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करीत होते. देशाच्या प्रमुख शहरात डिजिटल जाहिरातीचे काम मिळाल्याचे सांगून नवे ग्राहक आणल्यास कमिशन देण्याचे आमिष दाखवित होते. त्यामुळे नागरिक त्यांच्या जाळ्यात फसले. सुरुवातीला आश्वासन दिल्याप्रमाणे पैसे परत केल्यामुळे ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकले. त्यांचा व्यवसाय विदर्भासह हिमाचल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, बिहार आणि पूर्वेकडील मेघालय, मणिपूरपर्यंत पोहोचला. मार्च २०१९ पासून कोल्हे बंधू गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. पीडित नागरिकांनी पोलिसात तक्रार केली. शहर पोलिसांशी निगडित एक इव्हेंट मॅनेजर कोल्हे बंधूंच्या जवळचा होता. त्याच्या मदतीने कोल्हे बंधूंनी पोलिसांना शांत केले. परंतु गुंतवणूकदारांचा दबाव वाढल्यामुळे सुशील कोल्हेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुशीलच्या तक्रारीवरून पीडित गुंतवणूकदार आणि जमिनीच्या वादाशी निगडित नागरिकांविरुद्ध फसवणूक तसेच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर हे प्रकरण आल्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये कोल्हे बंधूंविरुद्ध फसवणूक व एमपीआयडीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोल्हे बंधू फरार झाले. आर्थिक शाखेच्या तपासात ३५ कोटी रुपयांची फसवणूक त्यांनी केल्याचे उघड झाले. तपासानंतर उमरेडच्या अजय लदवे यात सामील असल्याची माहिती मिळाली. आर्थिक शाखेने लदवेला अटक केली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. सहा महिने तपास केल्यानंतर ईडीने ईसीआयआर दाखल केला आहे.
........
संपत्ती विकून होत आहेत मालामाल
कोल्हे बंधू सुरुवातीपासूनच फसवणूक करण्यासाठी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यांनी फसवणूक करून जमविलेल्या रकमेतून अनेक ठिकाणी संपत्ती खरेदी केली आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या पूर्वीपासून ते संपत्ती विकून आपली रक्कम सुरक्षित करण्याच्या मागे लागले होते. त्यांनी छत्तीसगड येथील एक जमिनीची पॉवर ऑफ ॲटर्नी आपल्या वडिलांच्या नावे केली. त्याची माहिती असूनही पोलीस काहीच करू शकले नाहीत. फरार झाल्यानंतर कोल्हे बंधूंनी काटोल येथील जमिनीची कोट्यवधी रुपयात विक्री केल्याची माहिती मिळाली असून ते सध्या नेपाळमध्ये असल्याचे समजते.
..........