नागपूर: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २० हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नवी दिल्लीतील अॅमटेक समूहावर गुरुवारी देशभरातील ३५ ठिकाणी छापेमार कारवाई केली. या समूहाशी संबंधित हिंगणा येथील एका पंचतारांकित दर्जाच्या बॅटरी निर्मिती कारखान्यावरही ईडीने छापेमार कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपुरातील कारवाईची माहिती देण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
हिंगणा एमआयडीसी येथील बॅटरी निर्मिती करणारी कंपनी अॅमटेक समूहाला बॅटरीची निर्मिती करून पुरवठा करण्याचे काम करते. नागपुरातील ही कंपनी प्रख्यात असून पंचतारांकित दर्जा आहे. या कंपनीचा अॅमटेक समूहाशी निकटचा संबंध आहे. मात्र, बँक फसवणुकीप्रकरणात नागपुरातील कंपनीचा काहीही संबंध नाही. पण ईडीचे अधिकारी समूहासोबत झालेल्या या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
समूहाचे मोठ्या राजकीय नेत्यासोबत संबंधईडीच्या जाळ्यात फसलेल्या समूहासंदर्भात अनेक दावे करण्यात येत आहे. समूहाच्या संचालकांचे मोठ्या राजकीय नेत्यासोबत जवळचे संबंध आहेत. हा व्यक्ती काँग्रेसशी संबंधित आहे. या समूहाने चंद्रपूरच्या वणीजवळ एक कोळसा ब्लॉक खरेदी केला आहे. वरोरा येथेही स्पंज आयरन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु चार महिन्यातच प्रकल्प बंद झाला. कंपनीच्या रेकॉर्डवर गांधी नामक व्यक्तीला प्रमोटर म्हणून सांगितले जात आहे. तो वास्तव्यात एक अधिकारी आहे.