नागपूर : मानवी आरोग्यास हानिकारक सडक्या सुपारीची तस्करी थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणारे डॉ. मेहबूब चिमठाणवाला यांच्या चौकशीच्या बाबतीत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) बॅकफूटवर गेले. आता चिमठाणवाला यांची चौकशी मुंबईऐवजी नागपुरात केली जाईल, अशी माहिती संचालनालयाने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली.
अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या काही महिन्यात सुपारी तस्करीच्या विविध प्रकरणांत कारवाई केली आहे. त्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, संचालनालयाने चिमठाणवाला यांनाही समन्स बजावून १९ डिसेंबर रोजी मुंबईतील कार्यालयात चौकशीकरिता हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे चिमठाणवाला यांनी न्यायालयात या समन्सवर आक्षेप घेतला होता. चिमठाणवाला वयोवृद्ध व्यक्ती असून, ते मुंबईला जाऊ शकत नाही. ते नागपूरमधील कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती देण्यास तयार आहे.
याशिवाय, ते ऑनलाइन पद्धतीनेही माहिती देऊ शकतात, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. तसेच, संचालनालय चिमठाणवाला यांच्यावर मुंबईलाच येण्याचा दबाव टाकत आहे, असा आरोपही करण्यात आला होता व जनहित याचिकेत अंमलबजावणी संचालनालयाला प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे संचालनालयाने बॅकफूटवर जाऊन चिमठाणवाला यांची नागपुरातच चौकशी करण्याचा निर्णय घेतला. चिमठाणवालातर्फे ॲड. रसपालसिंग रेणू, तर संचालनालयातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. नंदेश देशपांडे यांनी कामकाज पाहिले.