नागपूर : ईडीने गुरुवारी नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे छापेमारी केल्यामुळे नागपुरसह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर इतवारी मस्कासाथ येथील व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर छापे मारण्यात आले. प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, हेमंत कुमार गुलाबचंद, वसीम बावला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवर छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
कोट्यावधींच्या आयकर शुल्काची चोरी करणाऱ्या नागपुरातील वरील पाच सुपारी व्यापाऱ्यांवर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी एकाचवेळी छापे टाकले. यामध्ये १८ घर व प्रतिष्ठानची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई, नागपूर विभागातील १३० अधिकाऱ्यांचा या कारवाईत समावेश आहे. छाप्यात सुपारी व्यवहाराची बेहिशोबी कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जप्त केल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांनी या पाच व्यापाऱ्यांची इतवारी, मस्कासाथ, कळमना, वर्धमाननगर येथील घरे आणि प्रतिष्ठानवर सकाळी छापे टाकले. अनेक व्यापाऱ्यांची गोदामे इतवारी मस्कासाथ आणि कळमना भागात आहेत, तर प्रकाश गोयल यांचे कोल्ड स्टोरेज कळमना बाजारात आहे. ही कारवाई दोन दिवस चालणार असल्याची माहिती आहे.
छापेमारी केलेले सर्व व्यापारी विदेशी सुपारी आयात करणारे आहेत. यापूर्वीही ते वेगवेगळ्या चौकशी एजंसीच्या रडारवर आलेले आहेत. ईडीच्या टीममध्ये मुंबईसह अन्य शहरातून आलेले अधिकारी असून मागील दोन दिवसांपासून ईडीचे पथक नागपुरात होते. या कारवाईत आणखी व्यापारी अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.