नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात काहीशी घसरण झाली असून त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. विदर्भात सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन तेलाचे भाव प्रतिकिलो १० रुपयांनी कमी होऊन १५० रुपयांवर आले आहेत. सर्वच तेलाचे भाव ७ ते १० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याने महागाईत गरीब व सर्वसामान्यांची चिंता कमी झाली आहे.
खाद्यतेल स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक आहे. दर वाढल्याचा परिणाम महिन्याच्या बजेटवर होत असतो. यावर्षी जानेवारीपासून सर्वाधिक विक्रीच्या सोयाबीनचे दर टप्प्याटप्प्याने वाढून प्रतिकिलो १७५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. पण आता सप्टेंबरच्या अखेरीस १५० रुपयांवर खाली आले आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये दर ९५ रुपये किलो होते. दर खाली असले तरीही नोव्हेंबरच्या तुलनेत भाव प्रतिकिलो ५५ रुपयांनी जास्तच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ होऊन महागाईचा चांगला तडाखा बसला. आता नवीन सोयाबीन शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत असल्याने आणि तेलाचे भाव अचानक कमी झाले. पुढे सोयाबीनच्या आवकीनुसार भाव कमी होण्याची शक्यता आहे. तेलाच्या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवर होत असल्याचे इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी सांगितले.
तेलाचे दर (प्रति किलो)
ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १६० १५०
सूर्यफूल १७० १६०
पामतेल १५५ १४८
शेंगदाणा १७० १६५
राईस ब्रान १६५ १५५
मोहरी १८० १८०
तीळ १८० १८०
जवस १८० १८०
म्हणून दर झाले कमी
नवरात्रोत्सवाच्या एक आठवड्यापूर्वी होलसेल बाजारात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. दर्जेदार सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून तेल बाजारात सोयाबीन तेलाचे भाव कमी झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत तेलाचे भाव जास्तच आहे. पण वाढत्या महागाईवर तेलात घसरण झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.
अनिल अग्रवाल, संचालक, राणी सती एन्टरप्राईजेस.
किराणा खर्चात बचत :
खाद्यतेलाच्या भावात काहीशी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव जास्त आहेत. अन्य किराणा वस्तूंचे भावही वाढले आहेत. पण थोडेफार भाव कमी झाल्याने किराणा खर्चात बचत होणार आहे.
दामिनी वैरागडे, गृहिणी.
काही महिन्यांपूर्वी खाद्यतेलासह सर्वच किराणा वस्तूंच्या भावात वाढ झाली होती. त्यात पेट्रोल आणि सिलिंडरच्या भावाने भर टाकली आहे. किराणा वस्तूंचे भाव कमी झाले नसले तरीही खाद्यतेलाच्या भावात घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे.
देवश्री पिंगळे, गृहिणी.