नागपूर : कोरोना महामारीत ग्राहकांची गरज ओळखून उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी सर्वच खाद्यतेलांच्या किमती वाढविल्या असून वर्षभरात उच्चांक गाठला आहे. विदर्भात सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणारे सोयाबीन तेल वर्षभरात तब्बल ५५ रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात प्रति किलो १४५ रुपयांचा आकडा गाठला आहे.
दरवाढीमुळे गरीब आणि सामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. स्वयंपाकघरात तेलाची फोडणी महाग झाली असून गरीब व सामान्यांची ओरड सुरू आहे. दरवाढीवर जबाबदार अधिकारी मूग गिळून बसल्याने साठेबाजांना दरवाढीसाठी रान मोकळे झाल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप आहे. सर्वाधिक वाढ सूर्यफूल तेलात झाली आहे. वर्षभरात प्रति किलो ९० रुपयांवरून १७० रुपयांवर तर सोयाबीन तेल ९० रुपयांवरून १४५ रुपयांवर पोहोचले आहे.
भारतात दरवर्षी सोयाबीन आणि पाम कच्च्या तेलाची ६० टक्के आयात होते. त्यापैकी जवळपास ५० टक्के आयात सोयाबीन कच्च्या तेलाची अर्जेंटिना व ब्राझील येथून तर जवळपास ८० टक्के पाम तेलाची आयात मलेशिया व इंडोनिशिया देशातून होते. शिवाय चीन सोयाबीन उत्पादक देशांमधून पाम आणि सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहे. आयात खर्च वाढल्याने देशांतर्गत स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. सोयाबीनला पुरेसा भाव मिळत नसताना खाद्यतेलाचे भाव का वाढत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे.
इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, देशात गेल्यावर्षी सोयाबीनचे ३० टक्के पीक आले. शिवाय अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून सोयाबीन कच्च्या तेलाची आयात कमी असल्याने देशांतर्गत स्थानिक बाजारपेठांमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यात सर्वच खाद्यतेलांच्या किमतीत किरकोळमध्ये प्रति किलो ३० ते ४५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरदिवशी दर वाढतच आहेत. ते किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. अग्रवाल म्हणाले, केंद्र सरकारने पाम तेलावर आयात शुल्क १० टक्के कमी केले, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. आयात व निर्यातीचा ताळमेळ बसत नसल्याने आणि उत्पादन कमी असल्याने पामतेलाचे भाव वाढतच आहेत.
कच्चा माल महागल्याने दरवाढ
सोयाबीन, शेंगदाणा आणि पामच्या कच्च्या मालाच्या किमती आकाशाला भिडल्याने पक्के खाद्यतेलाच्या किमती वधारल्या आहेत. खाद्यतेलाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, त्या तुलनेत कच्चा माल कमी आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन कसे येईल, त्यावर दर अवलंबून राहील. ऑगस्टमध्ये अमेरिकेत येणाऱ्या सोयाबीन पिकावर दर अवलंबून राहणार आहे.
राजूभाई ठक्कर, अध्यक्ष, ऑईल मर्चंट असोसिएशन.
खाद्यतेल दरवाढीने बजेट वाढले
वर्षभरात सोयाबीन व सूर्यफूल खाद्यतेलाची किंमत दुप्पट झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे. फोडणीला हात आखडता घ्यावा लागतो. सर्वच वस्तूंच्या दरवाढीने बजेट वाढले आहे.
ममता वैरागडे, गृहिणी.
दरवाढ कमी करावी
खाद्यतेलांसह अन्य आवश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. वर्षभरापासून किमती अतोनात वाढल्या आहेत. सण साजरा करण्याचे मोठे आव्हान आहे. आवक कमी आणि खर्च जास्त, अशी स्थिती आहे.
कविता देशपांडे, गृहिणी.
दरवाढ हे कोडेच
खाद्यतेलाचे दर एका वर्षात का वाढले, हे एक कोडेच आहे. खाद्यतेल हा दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. दर कितीही वाढले तरीही खरेदी करतोच. पण त्यामुळे महिन्याचा खर्च वाढला आहे. सरकारने लक्ष द्यावे.
सुजाता तिडके, गृहिणी.
खाद्यतेल (कि.) वर्ष २०२० वर्ष २०२१
सोयाबीन ९० रु. १४५ रु.
शेंगदाणा १३५ रु. १७० रु.
सूर्यफूल ९० रु. १७० रु.
जवस १०० रु. १५० रु.
मोहरी १०० रु. १५० रु.
पामोलिन ८० रु. १४० रु.
खोबरेल २०० रु. २४० रु.