नागपूर : ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाचे दर उतरले आहेत. प्रत्येक तेलामागे प्रतिकिलो ७ ते ८ रुपयांची घसरण झाली आहे. दरवाढीवर नियंत्रण आल्याने गरीब आणि सामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
यावर्षी जानेवारीपासून खाद्यतेलाचे दर आकाशाला भिडले आहेत. दर आठवड्याला दर वाढतच होते. नोव्हेंबर महिन्यात ९५ रुपयांवर असलेले सोयाबीनचे दर २० मेपर्यंत १६५ रुपये, तर सूर्यफूल १८० रुपयांवर पोहोचले होते. वाढत्या किमतीमुळे विविध ग्राहक संघटनांनी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली होती; पण काही दिवसांपासून मागणी कमी झाल्याने भाव थोडेफार कमी झाले आहेत. राणी सती एंटरपाइजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने खाद्यतेलाचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी झाले आहेत. त्यानंतरही दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. लग्नसराई, रेस्टॉरंट, हॉटेल्स, हातठेल्यावर पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे व्यवसाय बंद असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यानंतरही मध्यंतरी झालेली दरवाढ आश्चर्यकारक होती.
नागपूर खाद्यतेल बाजारात ७० टक्के सोयाबीन तेल विकले जाते. या तेलात सहा महिन्यांत ७० टक्के वाढ झाली. मात्र, दर केवळ ७ ते ८ रुपयांनी कमी झाले. दर आणखी ५ ते ६ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. नागपुरातून दररोज १३ ते १५ हजार टीनची (टीन १५ किलो) विक्री होते. त्यात ७ ते ८ हजार टीन सोयाबीन तेल, पाम तेल ५ ते ६ हजार टीन, राइस ब्रॅण्ड एक हजार टीन, सूर्यफूल एक हजार आणि शेंगदाणा तेलाचे ५०० टीन विकले जातात. भारतात विदेशातून ५० टक्के तेलबियांची अर्थात कच्च्या तेलाची आयात होते. इंडोनिशिया व मलेशिया येथून पाम तेल, शिकागो येथून सोयाबीन तेलाची आयात सुरू आहे. यंदा सोयाबीनला भाव जास्त मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला आहे. पीक चांगले आल्यास सोयाबीन तेलाचे दर कमी होतील, असे अग्रवाल म्हणाले.
खाद्यतेलाच्या दराचा प्रतिकिलो तक्ता :
खाद्यतेल दर
सोयाबीन १५८ रुपये
शेंगदाणा १७३ रुपये
पाम १५२
सूर्यफूल १७३
जवस १७८
मोहरी १७२
राइस १५८
खोबरेल २२५