- मोरेश्वर मानापुरे नागपूर - अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या संयशावरून ४,२३,१९० रुपये किमतीचे ३,४४५ किलो खाद्यतेल जप्त केले. भेसळयुक्त खाद्यतेल विक्रीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, वर्षभरात केलेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी किती तेल जप्त केले, याची आकडेवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही.
अधिकाऱ्यांनी जप्त तेलाचे नमूने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले. प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी.व्ही. मानवतकर यांनी १२ आणि १३ मार्च रोजी खाद्यतेल रिपॅकिंग करीत असलेल्या पूर्व नागपुरातील लकडगंज परिसरातील दोन प्रतिष्ठानांवर अचानक धाडी टाकून सखोल तपासणी केली. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ‘रिफाईड सोयाबीन तेल’ आणि ‘रिफाईड पामोलीन तेल’ या अन्नपदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. या साठ्याचे एकूण वजन ३,४४५.२ किलो आणि किंमत ४,२३,१९० रुपये इतकी आहे. हे नमुने अन्न प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कायदेशीर कारवाई घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासणी अहवालाच्या अनुषंगाने एका प्रतिष्ठानाला अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ आणि त्याअंतर्गत नियम व नियमनमधील कलम-३२ अन्वये सुधारणा नोटीस पाठविण्यात आली आहे. तर एका आस्थापनेस विनापरवाना व्यवसाय करीत असल्यामुळे, अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ अंतर्गत कायदेशीर कारवाई घेण्यात येत आहे. ही कारवाई सहआयुक्त (अन्न) कृष्णा जयपुरकर, सहायक आयुक्त (अन्न) प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी.व्ही. मानवतकर यांनी केली. ग्राहकांना अन्न पदार्थ गुणवत्तेबाबत कुठलीही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासकीय इमारत-२, सिव्हील लाइन्स येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.