आॅनलाईन लोकमतनागपूर : एका टोळीने ई-मेलद्वारे एअर पोस्ट इंडिया कुरिअर कंपनीची शाखा देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवतीला तीन लाखांनी फसवले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या टोळीने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे.लकडगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नफिस सफी अब्दुल्ला शेख (२९) रा. लकडगंज भंडारा रोड, नागपूर ही फसवणुक झालेली उच्चशिक्षित युवती आहे. २२ डिसेंबरला तिला एअर पोस्ट इंडिया कुरिअर अॅन्ड लॉजिस्टीक कंपनीकडून ई-मेल आला. त्यामध्ये नागपुरात कंपनीची शाखा देण्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. नफिस सफी यांनी शाखा घेण्यात रस दाखवून कंपनीला परत ई-मेल केला. नफिसला आरोपी अरविंद गांधी (४०) रा. गाजियाबाद, उत्तर प्रदेश याचा फोन आला. त्याने युवतीला तो कंपनीचा अधिकृत अधिकारी असल्याचे सांगितले. शाखेबाबत व्यवहारासंदर्भात फोनवरून चर्चा केली. नफिस हिला डिपॉझिट रक्कम म्हणून तीन लाख रुपयांच्या धनादेशाची मागणी केली. नामांकित कंपनीची शाखा मिळत असल्यामुळे नफिसने धनादेश दिले. त्यानंतर आरोपी रोमी धर्मवीर (२७) रा. नागलोही, दिल्ली हिचा फोन आला. तिने कंपनीची उपशाखा काही दिवसात मिळणार असल्याचे सांगितले. त्यासाठी बँकेत पैसे भरण्यास सांगितले. आरोपी मनिष देवसिंग रा. बदरपूर-दिल्ली याचा फोन आणि ई-मेल आला. त्याने कंपनीच्या एचआर विभागातून बोलत असल्याचे सांगून कंपनीच्या उपशाखेबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.२६ डिसेंबरपर्यंत या टोळीने धनादेश वटवून पैसे काढून घेतले आणि शाखा न देता फसवणूक केली. नफिस यांनी कंपनीच्या जाहिरातीबाबत माहिती काढली असता, कंपनीने अशी कोणतीही जाहिरात दिली नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक करणारी टोळी सराईत असल्याचे लक्षात येताच नफिस सफी हिने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरातील उच्चशिक्षित युवतीची तीन लाखांनी फसवणूक; ईमेलद्वारे दिले आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:05 PM
एका टोळीने ई-मेलद्वारे एअर पोस्ट इंडिया कुरिअर कंपनीची शाखा देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवतीला तीन लाखांनी फसवले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देउत्तरप्रदेशातील टोळी