लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोलीस्थित अहिल्यादेवी मंदिरात बुधवारी ईद मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्कार भारतीच्या प्रदेशअध्यक्षा कांचन गडकरी यांनी मातृशक्तीचे महत्त्व विषद केले. मुस्लीम समाज मागास आहे व त्यातील महिलांची स्थिती हलाखीची आहे. मुस्लिम महिलांजवळ कौशल्य आहे पण त्याला शिक्षणाची जोड मिळणे आवश्यक आहे. घरातील आई सुशिक्षित, सुसंस्कारीत असली तर ते कुटुंब, समाज व देशही प्रगती करतो व सुसंघटित होतो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.सर्व पंथ सद्भाव समन्वय समितीच्यावतीने ईद मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे, मुकुंद कुळकर्णी, विचारवंत अॅड. मुजाहिद खान, माजिद पारेख, भदंत मित्यानंद, डॉ. अभिरुची जैन-पळसापुरे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. जफर अहमद खान, म्युर मेमोरियल हॉस्पिटलचे विलास शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, भारत हे माझे घर आहे, माझे कुटुंब आहे, हे मार्गदर्शक तत्त्व मनात रुजले की या देशासाठी प्राणही देण्यास आपण तयार होतो. ईश्वरानेच आम्हाला या देशात एकत्र निर्माण केले, त्यामुळे आमचे नाते आहे. या भारताचा द्वेष करणाऱ्या शत्रूंनी आपले सर्व धर्मीय ऐक्य तोडण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. मात्र आपण एकत्र राहिलो तर कुणी आम्हाला तडा देऊ शकत नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.जफर अहमद म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात विशिष्ट धर्माचे नाही तर सर्वधर्मियांचे योगदान राहिले आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाज मागास राहिला आहे. मुस्लिम समाजाने विशिष्ट राजकीय पक्षाविषयी अंतर ठेवले होते. मात्र गेल्या पाच वर्षात अल्पसंख्याकांच्या विकासनिधीमध्ये वाढ झाली आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व तरुणांच्या रोजगाराच्या अनेक गोष्टी या सरकारने केल्या आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी जो समाजाच्या प्रगतीसाठी काम करेल त्यांच्यासोबत यावे, असे आवाहन केले. अॅड. मुजाहिद यांनी, हा देश विशिष्ट धर्माचा नाही तर सर्वांचा असून या सर्व धर्मियांच्या प्रगतीची, संरक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, असे मनोगत मांडले. माजिद पारेख म्हणाले, कुराण आम्हाला सर्व धर्मियांचा आदर करायला शिकविते. अल्लाहने आपल्याला सामाजिक प्राणी म्हणून पृथ्वीवर पाठविले आहे. त्यामुळे या देशात शांतता नांदेल, भेदभाव नष्ट होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वसुधैवकुटुंबकमची संकल्पना कुराणमध्येही सांगितली आहे. त्यामुळे या देशात बंधुभाव टिकविणे आपली जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही आपले मनोगत मांडले. प्रास्ताविक शाम देशमुख यांनी केले. संचालन व आभार लीना गहाने यांनी मानले.