योगेश पांडे नागपूर : आर्थिक तंगीतून बाहेर पडण्यासाठी दुचाकी चोरणारा सुशिक्षित तरुण पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसील पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून ८ दुचाकी जप्त केल्या. सय्यद गुफरान सय्यद निजाम (२६, हैदरी रोड, मोमीनपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
गुफरानच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गुफरान पैसे कमवण्याचा मार्ग शोधत होता. पैसे कमविण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. हॉस्पिटल किंवा अपार्टमेंटसारख्या गजबजलेल्या भागातून तो दुचाकी चोरायचा. तो स्वत:ची दुचाकी चालवत चोरी जाऊ शकतील अशा दुचाकींचा शोध घ्यायचा व डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून दुचाकी चोरून नेत असे.
चोरीला गेलेली दुचाकी सुरक्षित ठिकाणी ठेवल्यानंतर तो स्वत:ची दुचाकी घेण्यासाठी परत यायचा. वर्षभर हा क्रम सुरू होता. दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असताना तहसील पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून गुफरानच्या कृत्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तहसील, गणेशपेठ व मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोन दुचाकी विकल्यानंतर गुफरान इतर वाहनांसाठीदेखील. त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी वाहन चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, विनायक कोल्हे, राजेशसिंह ठाकूर, शंभूसिंह किरार, यशवंत डोंगरे, पंकज निकम, पंकज बागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नंबर प्लेट बदलून करायचा विक्रीगुफरान हा दुचाकी चोरल्यानंतर नंबर प्लेट बदलायचा व त्यानंतर ऑनलाईन बिझनेस साईटवर दुचाकीचा फोटो टाकून ग्राहक शोधायचा. कमी किमतीत तो दुचाकी विकायचा व दोन-तीन महिन्यांत मूळ कागदपत्रे परत करण्याचे आश्वासन द्यायचा. त्याने कामठी व भंडारा येथे दोन दुचाकी विकल्या. एक दुचाकी तर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानानेच विकत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.