लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला यांनी हिंदीतून रोजगार उपलब्ध करणारे शिक्षण मिळावे, असे मनोगत व्यक्त केले. हिंदी नेहमी अत्याचाराशी लढणारी भाषा राहिली आहे. या भाषेने परिवर्तन घडविले आहे. आज हीच बाजाराचीही भाषा आहे. मात्र तिला जनाजनाची स्वीकारार्हता मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदी भाषेतून रोजगार देणारे शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध विषयावर आपले मत मांडले.शब्दांचे आदानप्रदान आवश्यकप्रा. शुक्ला म्हणाले, हिंदी काळानुरुप चालणारी भाषा आहे. हा स्वभाव जतन करून ठेवण्यासाठी वेळेशी जोडून ठेवणे गरजेचे आहे. आजच्या संचार माध्यमात हिंदी भाषेचा वापर वेगाने वाढत असून ही बाब आनंददायक आहे. या विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने हिंदीची सेवा करणाऱ्या विविध संस्थांना एकत्रित करून या भाषेचा विस्तार करणे ही माझी जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हिंदीत इतर भारतीय भाषांचे शब्द स्वीकारणे आणि आपले शब्द इतर भाषांना देत राहणे आवश्यक आहे. पूर्वीप्रमाणे हिंदी भाषेत नवीन शब्दांचा अंतर्भाव होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी, विनोबा, गोळवलकर, लोहिया आदींनी सामान्य नागरिकांच्या अनेक शब्दांचा वापर हिंदीत वाढविला व त्यामुळे नवीन शब्दांचे सृजन होत गेले. आता मात्र तसे होताना दिसत नसल्याची चिंता त्यांनी मांडली.भाषा विकासात शिस्त जरूरीहिंदी भाषिक क्षेत्रातही आज शिकणे व शिकविण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. याचे थेट परिणात हिंदी भाषेवर झाले आहेत. व्याकरण हे जसे भाषेचा कारखाना आहे तशी व्याकरणातून शिस्तही येते. शिस्त नसेल तर तुम्ही शब्दांशी खेळू शकत नाही आणि असे झाले तर ती भाषा अडचणीची आणि कंटाळवाणी वाटते. हिंदी भाषेची अडचण हीच आहे की यामध्ये शब्दांचा जन्म झाला, ते वाढले, दीर्घ काळ वापरले गेले आणि एक दिवस मृतप्रायही झाले. त्यामुळे जेव्हा हिंदीला शब्दांची गरज पडली तेव्हा इंग्रजी भाषेकडून उधार घेण्याची पाळी आली, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. परिस्थिती बदलण्यासाठी हिंदीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने परिवर्तन घडविण्याच्या दिशेने विचार करणे व काम करणे आवश्यक आहे. वर्ध्याचे हिंदी विश्वविद्यालय या दिशेने पुढाकार घेणार असल्याचे प्रा. शुक्ला यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या क्षेत्रातही विस्ताराची भावना त्यांनी व्यक्त केली.प्रा. शुक्ला यांचा परिचयप्रा. रजनीश कुमार शुक्ला हे सध्या भारतीय दार्शनिक संशोधन परिषद, नवी दिल्लीचे सदस्य सचिवपदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसीमध्ये तुलनात्मक दर्शन आणि धर्म या विषयाचे प्राध्यापक तसेच बनारस हिंदू विद्यापीठात न्यायालयाद्वारे मनोनित सदस्य म्हणून कार्य सांभाळले आहे. शिवाय ते दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे वाराणसी क्षेत्राच्या सल्लागार समितीचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला व बीएचयूमधून दर्शनशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली. त्यांनी सात पुस्तकांचे लेखन केले असून, त्यांच्या १०० पेक्षा जास्त शोधपत्र, आलेख देश-विदेशातील शोधपत्रिकांमध्ये प्रकाशितही झाले आहेत. त्यांनी कुलसचिव, कार्यकारी परिषदेचे सदस्य, कॉलेज विकास परिषदेचे संचालक आणि इतर अनेक पदांवर राहून विश्वविद्यालयात आपली सेवा दिली आहे.
हिंदीतून मिळावे रोजगार उपलब्ध करणारे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:45 PM
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला यांनी हिंदीतून रोजगार उपलब्ध करणारे शिक्षण मिळावे, असे मनोगत व्यक्त केले. हिंदी नेहमी अत्याचाराशी लढणारी भाषा राहिली आहे. या भाषेने परिवर्तन घडविले आहे. आज हीच बाजाराचीही भाषा आहे. मात्र तिला जनाजनाची स्वीकारार्हता मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदी भाषेतून रोजगार देणारे शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध विषयावर आपले मत मांडले.
ठळक मुद्देमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू रजनीशकुमार शुक्ला