नागपूर : प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासनातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. विविध सरकारी कार्यालयांत या अंतर्गत शिबिर लावून लोकांच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु शिक्षण विभाग याला अपवाद आहे. नागपुरात शिक्षण उपसंचालक कार्यालय आहे. सहाही जिल्ह्यांतील शिक्षणाचे काम येथून सुरू राहते. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी सेवा पंधरवडा राबवावा, अशी मागणी होत आहे.
शिक्षण विभागाकडेही शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक, पालक, विद्यार्थी यांच्या भरपूर तक्रारी आहेत. अनुकंपाधारकांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. दिव्यांग शिक्षकांचा पदोन्नतीचा विषय, भविष्य निर्वाह निधीमधून शिक्षक-कर्मचाऱ्यांची ऑफलाइन उचल, अनुकंपा नियुक्तींना मान्यता, अवैध नियुक्त्या आदी भरपूर प्रश्न आहेत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक स्तरावर हे प्रश्न सोडविण्यासाठी सेवा पंधरवडा राबवावा, अशी मागणी खासगी शाळा शिक्षक संघाचे प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार आदींनी केली आहे. अन्यथा २६ सप्टेंबरपासून कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.