विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ : कक्षात असूनही निमंत्रण नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या शाळातील इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी गौरव केला जातो. असे कार्यक्रम महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्षनेते आदींचा उपस्थितीत करण्याची गेल्या काही वर्षातील परंपरा आहे. परंतु यावेळी शिक्षण विभागाने ही प्रथा मोडित काढली. मंगळवारी महापौर कक्षात बारावीतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावे, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव आपल्या कक्षात बसून होते. परंतु त्यांना शिक्षण विभागाकडून निमंत्रणच आले नाही. शिक्षण विभागाला जाधव नकोसे झाल्याने त्यांना डावलण्यात आल्याची महापालिकेत चर्चा आहे. महापौर कक्षात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यासाठी प्रभारी महापौर दीपराज पार्डीकर, शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे आरोग्य सभापती मनोज चाफले आदींना निमंत्रित करण्यात आले होते. दिवे उशिरा आल्याने कार्यक्रम उशिराने सुरू करण्यात आला. परंतु संदीप जाधव समिती कक्षात निमंत्रणाची प्रतीक्षा करीत होते. मात्र त्यांना सत्कार कार्यक्रमाला बोलावण्याचे टाळण्यात आले. शिक्षण विभागातील अधिकारी जाधव यांना विसरले असतील, पण दिवे कसे विसरले. असा प्रश्न नगरसेवक ांना पडला आहे. निमंत्रण नसल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली. महापालिका निवडणुकीत भाजपाला विक्रमी बहुमत मिळाले आहे. १५१ पैकी तब्बल १०८ नगरसेवक निवडून आलेले आहेत. या नगरसेवकांना नियंत्रणात ठेवण्याची कसरत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना करावी लागत आहे. परंतु प्रथमच निवडून आलेले नगरसेवक अतिउत्साहात ज्येष्ठ सदस्यांना डावलण्याचे प्रकार वाढलेले आहेत. यावर काही ज्येष्ठ सदस्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. कनिष्ठांना कक्ष , ज्येष्ठ वाऱ्यावर महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींना ज्येष्ठतेच्या आधारावर कक्षाचे वाटप करण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा मोडित काढली आहे. ज्येष्ठ सभापतींना निश्चित असलेल्या कक्षावर पहिल्यांदाच निवडून आलेल्या सभापतींनी प्रशासनाची अनुमती न घेता कब्जा केला आहे. यामुळे सभागृहातील अभ्यासू व ज्येष्ठ सभापतींना अद्यापही कक्ष उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे त्यांना स्थायी समितीच्या सभागृहात समितीची बैठक संपली की कनिष्ठ सभापती वा अधिकाऱ्यांच्या कक्षात ठाण मांडावे लागते. अपमानास्पद वागणूक मिळत असूनही उघडपणे बोलता येत नाही. जाधव यांच्याबाबतीत असाच प्रकार घडल्याची चर्चा आहे.
शिक्षण विभागाला स्थायी समिती अध्यक्ष नकोसे
By admin | Published: May 31, 2017 2:56 AM