लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत उद्योगक्षेत्राला यापुढील १० वर्षांचे ज्ञान अपेक्षित आहे, परंतु महाविद्यालयांत मात्र ५० वर्ष जुन्या तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत. अशा स्थितीत विद्यार्थी रोजगारापासून वंचित राहतात. त्यामुळे देशाच्या व राज्याच्या शिक्षणप्रणालीत आमूलाग्र बदल आवश्यक आहे. सरकारने अभ्यासक्रम बनविताना प्राधान्य ठरवायला हवा. विद्यार्थी हितांवर जास्त भर द्यायला हवा. तसेच गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला मिळायला हवे, असे प्रतिपादन करत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच चिमटा काढला. जनआशीर्वाद यात्रा नागपुरात आली असताना मंगळवारी दुपारी त्यांनी प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यातील प्रत्येकच विद्यापीठामध्ये काही ना काही त्रुटी आहेत. मी सरकारविरोधात बोलत नाही. परंतु जिथे नेटवर्क नाही तेथे ‘ऑनलाईन’ प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. सरकारने सारासार विचार करुन प्राधान्य ठरविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो व विविध पातळ्यांवर एकच विषय शिकवल्या जातो. संपूर्ण देशात एकच अभ्यासक्रम लागू झाला पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मुलांना शेती का करायची नाही ?शहरी भागातील लोक निसर्गापासून दूर चाललेत. तर शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करायची नाही, असे चित्र दिसून येत आहे. शेतीतून बाहेर पडण्याचा नवीन पिढी विचार करत आहे. त्यांना असे पाऊल का उचलावे वाटत आहे, यावर मंथन झाले पाहिजे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायलाच हवा, असे एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले. पिकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला व तो शिवसेनेने बाहेर काढला. आमच्या मुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांचा निधी मिळाला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही नेहमीच आवाज उठवू, असे त्यांनी सांगितले.प्रत्येकाला ‘मिलिटरी ट्रेनिंग’ नकोमहाविद्यालयीन जीवनात प्रत्येकाला ‘मिलिटरी ट्रेनिंग’ का नाही, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला. अशा प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे. मात्र काही देशविघातक तत्त्व याचा दुरुपयोग करू शकतात. त्यामुळे सरसकट ‘मिलिटरी ट्रेनिंग’ची गरज नाही. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे निश्चित दिले गेले पाहिजे, असेदेखील आदित्य ठाकरे म्हणाले.आरक्षण आवश्यक पण सर्वांना समान संधी मिळावीआजच्या तरुणांनी जात, पात , धर्म याच्याहून पुढे जात विचार केला पाहिजे. वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहेच. परंतु सर्वानाच समान संधी मिळाली पाहिजे यावरदेखील लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.
गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला हवे : आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 7:40 PM
गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला मिळायला हवे, असे प्रतिपादन करत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच चिमटा काढला.
ठळक मुद्देविद्यापीठ, महाविद्यालयांत मिळते ५० वर्षांपुर्वीचे शिक्षण