- विवेक घळसासी : आईदानजी बिंझाणी व्याख्यानमाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण, कौशल्य व ज्ञानाच्या माध्यमातून मानवजातीचे कल्याण साधणे, हेच उद्दिष्ट असावे असे आवाहन सुप्रसिद्ध वक्ते विवेक घळसासी यांनी केले.
नागपूर शिक्षण मंडळाच्या वतीने स्व. आईदानजी बिंझाणी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक गांधी होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुजित मेत्रे, प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे उपस्थित होते.
शिक्षणातून प्राप्त झालेली कौशल्ये ही अवघ्या चराचराच्या कल्याणासाठी समर्पित असतात. ही मनोवस्था म्हणजेच ज्ञानप्राप्ती होय. शिक्षण ही आईच्या गर्भापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत अक्षुण्णपणे चालणारी एक परंपरा असून, ही ज्ञानपरंपरा भारतीय संस्कृतीने दिली आहे, असे घळसासी यावेळी म्हणाले.
डॉ. वैशाली उपाध्ये यांनी गायलेल्या सरस्वती वंदनेने व्याख्यानसत्राची सुरुवात झाली. प्रास्ताविक डॉ. सुजित मेत्रे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी करवून दिला. संचालन प्रा. पूनम खेडकर यांनी केले तर आभार डॉ. नरेंद्र रघटाटे यांनी मानले.
.............