लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे शाळा कधी सुरू करायच्या, यावर विचारमंथन सुरू आहे. शहरी शाळांमध्ये ऑनलाईन लर्निंग सुरू झाले आहे. खासगी आणि जिल्हा परिषदांच्या शाळांनीही यात पुढाकार घेतला आहे. मात्र आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे.
दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांचे मोठे योगदान आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. एकट्या नागपूर विभागाचा विचार केला तरी या विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ९२ हजार विद्यार्र्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनलॉक लर्निंग प्रकल्प हाती घेण्याचे ठरले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन शिकवायचे, ही संकल्पना होती. मात्र पावसाळ्यात अनेक गावांपर्यंत बसेस पोहचत नाही; अशा गावांमध्ये शिक्षकांनी रोज जाऊन शिकविणे कसे शक्य होईल, याचा विचारच यात झालेला नाही. वस्ती, तांडे, पोड, पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी गावांची लोकसंख्या फारच कमी असते. अशा गावांमध्ये शिकणारे विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतपत असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहचायचे कसे, हा अडचणीचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात आदिवासी शाळांसाठी अनलॉक लर्निंग राबविताना या बाबींचा विचार झाला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, गावापर्यंत इंटरनेट सुविधा नसणे, दळणवळणासाठी योग्य रस्ते नसणे या येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मुख्य अडचणी आहेत. वसतिगृह आणि शाळा कधी सुरू होणार याचा अद्यापही पत्ता नसल्याने आज तरी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.नामांकितचेही शिक्षण सुविधांमुळे अडलेशहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेशाची योजना आहे. राज्यात २५ हजार तर नागपूर विभागात सुमारे १० हजार विद्यार्थी यातून शिक्षण घेतात. या शाळा शहरात असून त्यात शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, अँड्रॉईड मोबाईलसारख्या सुविधा आहेत. या शाळांनी आपल्या व्द्यिार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले असले तरी आदिवासी भागात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांकडे अशा सुविधा नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू होऊनही हे विद्यार्थी मात्र अन्य व्द्यिार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सत्र सुरू झाल्यावर या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शाळा भरून काढणार का, हा सुद्धा प्रश्नच आहे.