विजय भुते
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवणी : राज्य शासनाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत कोलितमारा (ता. पारशिवनी) येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी आश्रमशाळेची निर्मिती करण्यात आली. सुसज्ज इमारतीत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाही. येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविण्यात आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय हाेण्याची शक्यता बळावली आहे.
या शाळेच्या इमारत बांधकामावर काेट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ९५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, काेराेना संक्रमणामुळे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे १६ विद्यार्थी सध्या शाळेत हजर असल्याची हजेरी बुकावर नाेंद आहे; परंतु त्यांना शिकवायला शाळेत एकही शिक्षक नाही. शनिवारी शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी दिवसभर मैदानावर खेळत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. काही शिक्षक शुक्रवारी त्यांच्या गावी जात असून, ते साेमवारी किंवा मंगळवारी परत येत असल्याने तीन ते चार दिवस शाळा शिक्षकाविना असते.
या शाळेला प्रशस्त इमारत, क्रीडांगण, वसतिगृह, संगणकक्ष यासह अन्य सुविधा आहेत. मात्र, त्या शिक्षकाविना शाेभेच्या वास्तू ठरल्या आहेत. या शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याने ही शाळा सध्या बेवारस असल्यागत आहे. प्रशासनाचा हा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळल्यागत असल्याने पालकांमध्ये असंताेष निर्माण झाला आहे. लाेकप्रतिनिधीही यश प्रकाराची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पालकांनी सांगितले.
...
१७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
या शाळेत एकूण १७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असली तरी सध्या शाळेचा कारभार चार शिक्षकांवर सुरू आहे. यातील दाेन शिक्षक प्रकल्प अधिकारी कार्यालय नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर तर एक शिक्षिका रजेवर आहे. मुख्याध्यापकाचे पद रिक्त असून, प्रभारी मुख्याध्यापक आर. जी. बाेचर कामानिमित्त नागपूरला गेल्याचे प्रत्येक वेळी सांगण्यात येते. काही कर्मचाऱ्यांना नागपूर व वर्धा येथील अप्पर आयुक्त कार्यालय व वसतिगृहात प्रतिनियुक्तीवर आहे. लिपिक व मानधनावरील संगणक शिक्षकाला नागपूरला बाेलावले आहे. या शाळेत इंग्रजी, विज्ञान व गणित विषयाला शिक्षकच नाहीत. माध्यमिकला पाच शिक्षकांची गरज असताना दाेन शिक्षकांवर काम चालविले जात आहे. प्राथमिकसाठी आठपैकी दाेन शिक्षक आहेत. वसतिगृहाच्या महिला अधीक्षक अद्याप रुजू झाल्या नाहीत.