लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजाला विकासाच्या दिशेकडे नेण्यात शैक्षणिक संस्थांची मौलिक भूमिका असते. विशेषत: बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून विदर्भासारख्या भागाचा चेहरामोहरा बदलून विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. बुधवारी ऑनलाईन माध्यमातून आयोजित व्हीएनआयटीच्या १९ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ते बोलत होते. (Educational institutions should change the face of Vidarbha; 19th Convocation Ceremony at VNIT)
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, कुलसचिव डॉ. एस. आर. साठे प्रामुख्याने उपस्थित होते. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन शासनाच्या अनेकविध प्रकल्पांमध्ये शैक्षणिक संस्था आपले योगदान देऊ शकतात. विशेषत: उद्योगांना लक्षात घेऊन कार्य करायला हवे. व्हीएनआयटीसारख्या संस्थांनी रस्ते अभियांत्रिकी, ड्रोन तंत्रज्ञान तसेच तंत्रज्ञानाच्या विकसित होत असलेल्या शाखांमध्ये योगदान देणे गरजेचे आहे. तसेच विदर्भातील नैसर्गिक संपदेचा विदर्भाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, याचा विचार संस्थेने करायला हवा. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान आणि कौशल्य समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. डॉ. पडोळे यांनी प्रास्ताविक केले.
वातावरण बदलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार
आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाने मोठी उडी मारली आहे. कोरोना साथीच्या काळात नव्या तंत्रज्ञानालाही जन्म दिला आहे. पण, येत्या काळात अशा नव्या साथींना तसेच वातावरण बदलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, हे निश्चित आहे. त्यांचा सामना करण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये उत्तम संशोधन आणि इनोव्हेशन होणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. शेखर मांडे यांनी केले.
१,१३४ पदव्यांचे ऑनलाईन वितरण
ऑनलाईन कार्यक्रमात १ हजार १३४ विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. यात ४९ जणांना पीएच. डी., ३३३ जणांना एम. टेक., ६३४ विद्यार्थ्यांना बी. टेक. व ५९ विद्यार्थ्यांना बी. आर्क. ही पदवी प्रदान करण्यात आली. संशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४६ पदके आणि शैक्षणिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे ऑनलाईन समारंभ असला तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष विद्यार्थी संचालकांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारत आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले होते.
.