लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीने तयार झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सेवासदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बुधवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.सीताबर्डी येथील सेवासदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण नुवाल हे होते. याशिवाय आ.नागो गाणार, चेन्नई येथील उद्योजक श्री.आर.श्रीधर, संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूलचे सचिन देशपांडे व भाग्यश्री देशपांडे यांना रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा पाया आहे. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही. तर शिकलेल्या गोष्टींचा व्यावहारिक उपयोग कसा करावा याचा विवेक ज्ञानात असतो. प्रत्येकाच्या कलेचे काही ना काही महत्त्व असते. त्यामुळे जे आहोत त्याची लाज वाटता कामा नये. स्वत्वाचे जागरण करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.देशात शिक्षणाचा प्रचार-प्रसार होत आहे. जागृतीदेखील वाढते आहे. मात्र देश, समाज, कुटुंबाप्रति संवेदना नसणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच शिक्षणातून हे संस्कार होणे आवश्यक आहे, असे मत नुवाल यांनी व्यक्त केले. नवीन पिढी ही नोकरी मागणारी नको, तर नोकरी देणारी असावी. तरुणांनी कृषी क्षेत्रातील उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सचिन देशपांडे यांनी केले. कांचन गडकरी यांनी प्रास्ताविकातून सेवासदन संस्थेच्या प्रवासावर भाष्य केले. महिला सक्षमीकरणात संस्थेच्या कार्यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. मंचावर सेवासदन शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती भागवत, सचिव इंदुबाला मुकेवार, प्रमोद मसराम, सहसचिव भागवत भांगे हेदेखील उपस्थित होते. आशुतोष अडोणी यांनी संचालन केले.महिलांना बेड्यांतून बाहेर काढावेदेशाची प्रगती होणे अपेक्षित असेल तर महिलांची उपेक्षा करुन चालणार नाही. मातृशक्तीमध्ये स्वत:च प्रगतीची असामान्य ताकद असते. मात्र महिलांना स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. आपल्या परंपरेत नसलेल्या मात्र मध्ययुगीन काळात लादल्या गेलेल्या बेड्यांमधून त्यांना बाहेर काढावे लागेल, असे प्रतिपादन करत सरसंघचालकांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याबाबत भाष्य केले.पुढे काय होईल यावर शैक्षणिक धोरण अवलंबूनयावेळी सरसंघचालकांनी देशातील नवीन शैक्षणिक धोरणावरदेखील भाष्य केले. नवीन शैक्षणिक धोरण तयार झाले आहे, असे ऐकिवात आहे. मात्र अद्याप ते लागू झाले नाही. पुढे काय होईल त्यावर शैक्षणिक धोरण कधी व कसे लागू होईल हे अवलंबून असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.