लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अॅन्टीव्हायरस’चे काम करतात. शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ‘माफसू’चे (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज् सायन्स युनिव्हर्सिटी) कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गुरुवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे होते. सोबतच प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ.प्रकाश इटनकर व डॉ.चंद्रशेखर साखळे यांना उत्कृष्ट शिक्षक, डॉ. वासुदेव गुरनुले यांना उत्कृष्ट संशोधक तर डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांना उत्कृष्ट लेखक हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आजच्या काळात पुस्तकी धडे, कौशल्य हे तर आवश्यक आहेच. मात्र विद्यार्थ्यांच्या मनातील मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. ज्ञान आणि शहाणपण यांचे एकत्र बीजारोपण होणे आवश्यक आहे, असे डॉ.आशिष पातूरकर म्हणाले. शिक्षण हा केवळ एक व्यवसाय नसून ते सदासर्वदा आचरण्याचे एक व्रत आहे. वेळेच्या बंधनात शिक्षकाला अडकवता येऊ शकत नाही. विद्येच्या माध्यमातून मिळविलेली प्रतिष्ठा ही शाश्वत असते. कोचिंग क्लासेसच्या मागे लागून पैसा मिळविणारा व्यक्ती खरा शिक्षक होऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या शिक्षकांनी नीतीमत्तेचा मार्ग धरून चालायला हवे. तसेच संत कबीर आणि डॉ, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मार्ग सर्वांनी अनुसरायला हवा, असा सल्ला कुलगुरू डॉ.काणे यांनी दिला. डॉ.प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले तर डॉ.नीरज खटी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारिणी सदस्य, प्राचार्य, विद्यापीठाचे विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
प्रभावी सुविचार हे विद्यार्थ्यांसाठी ‘अॅन्टीव्हायरस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 11:16 PM
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अॅन्टीव्हायरस’चे काम करतात. शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ‘माफसू’चे (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज् सायन्स युनिव्हर्सिटी) कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गुरुवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
ठळक मुद्देआशिष पातूरकर : नागपूर विद्यापीठात उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान