नागपूर : डाक विभागाने कार्यालयात वाढती विजेची गरज लक्षात घेता, अक्षय ऊर्जा स्राेतांचा आधार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत नागपूरच्या इतवारी सीटीओ आणि अमरावतीच्या टपाल कार्यालयात साेलर पॅनल लावण्यात आले आहेत. यामुळे वीज बिलाचा खर्च अर्ध्याने वाचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
साेलर पॅनलला पाॅवर ग्रीडने जाेडण्यात आले आहे. यामध्ये अक्षय ऊर्जेच्या उपयाेगाने हाेणारी बचत वीज बिलातून कापण्यात येते. उल्लेखनीय म्हणजे सध्या डाक विभागात माेठ्या प्रमाणात ग्राहक सेवेचे कार्य केले जात आहेत. यात आधार अपडेशन, पारपत्र, पॅनकार्डसह इतर अनेक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पार्सल बुकिंगची कामेही वाढली आहेत. शिवाय इंडिया पाेस्ट पेमेंट बँक सुरू झाल्याने काम वाढले आहे. आधुनिक पद्धतीने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दर्पण डिव्हाईस देण्यात आले आहे. हा एक लहान संगणकाप्रमाणे असताे. याला माेबाईलशी जाेडण्यात येते आणि एटीएम कार्डही स्वॅप करण्यात येते. यामुळे पाेस्टमनची उपकरण चार्जिंगची गरज वाढली आहे. २०२१-२२ मध्ये निधी मिळाल्यास इतरही डाकघरांना साेलर पॅनल लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.