सुमेध वाघमारे
नागपूर : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’त (एम्स) आता अशी व्यवस्था उभी केली जाणार आहे ज्यामुळे येथील एकही रुग्ण ‘रेफर’ होणार नाही. त्यासाठी वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह, शिक्षकांची भरती व ५०० वरून ९६० बेड केले जाणार आहेत. याच्या प्रयत्नाला सुरुवात झाल्याचा दुजोरा एम्सच्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिला.
‘एम्स’चे औपचारिक उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नागपूर ‘एम्स’मुळे देशभरातील आरोग्यसेवा बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर खरे उतरण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच ‘एम्स’ प्रशासन कामाला लागल्याचे दिसून येत आहे. मिहानच्या १५० एकरमध्ये पसरलेल्या ‘एम्स’मधून २०१९ मध्ये ‘ओपीडी’ स्तरावर रुग्णसेवा सुरू झाली. सध्या १८ विविध विभागांतून रुग्णसेवा दिली जात आहे, तर १३ विविध सुपर स्पेशालिटी विभागातून रुग्णसेवा सुरू आहे. अद्ययावत उपचार पद्धती व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होऊ घातल्याने ‘एम्स’कडून विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणामधील रुग्णांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
रोज १८०० ते २००० रुग्ण
‘एम्स’च्या ‘ओपीडी’मध्ये रोज १८०० ते २००० रुग्ण येतात. आतापर्यंत ६ लाख ५० हजारांहून अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली. विविध वॉर्डांतून २१ हजार ७९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. २४ तास आपत्कालीन सेवा, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजीची सोय असल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे.
२५० सुपर स्पेशालिटी खाटांची पडणार भर
डॉ. विभा दत्ता म्हणाल्या, ‘एम्स’मध्ये सध्या ५०० बेड रुग्णसेवेत आहेत. लवकरच सुपर स्पेशालिटीचे २५० बेड रुग्णसेवेत रुजू होतील. यामुळे बेडची संख्या वाढून ७५० होईल. आमचे ९६० बेडचे लक्ष्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात झाली आहे.
३०० वरिष्ठ निवासी डॉक्टरांची गरज
मनुष्यबळ वाढविण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला. यात ३०० वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह विविध विभागाच्या शिक्षकांच्या पदाला मंजुरी प्रस्तावित असल्याचेही डॉ. दत्ता म्हणाल्या.
नव्या वर्षात किडनी प्रत्यारोपण
‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार म्हणाले, नव्या वर्षात किडनी प्रत्यारोपण सुरू करण्याचा प्रयत्न आहे. २०२४ मध्ये यकृत प्रत्यारोपण, तर त्यानंतर हृदय प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेण्यात येईल. यामुळे ‘एम्स’मध्ये येणारा एकही रुग्ण रेफर होणार नाही.
दिल्लीनंतर नागपूर एम्सचा क्रमांक!
‘एम्स’मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास ९६० बेड पूर्ण क्षमतेने सुरू होतील. रुग्णसेवेत जसे दिल्ली एम्स पहिल्या क्रमांकावर आहे तसे नागपूर एम्स दुसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न आहे.
- डॉ. विभा दत्ता, (मेजर जनरल) संचालक, एम्स