गणेश हूड,नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी देण्यात येतात. मात्र यासाठी बाजारभावानुसार अनुदान मिळत नव्हते. प्रति अंडे पाच रुपये अनुदान मिळत होते. मात्र बाजारात अड्यांचा दर प्रति अंडे ६ ते ६.५० रुपये आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांची चिंता वाढली होती. शासनाने आता राष्ट्रीय अंडी समन्वय समित[ने निर्धारीत केलेल्या बाजारभावाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच काही दिवसापुर्वी महाराष्ट्र शासनाने एका शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत एक डिसेंबरपासून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी तसेच अंडी न खाणा-या विद्यार्थ्यांना केळी देण्याचा निर्णय घेतला प्रतिअंडे पाच रूपये प्रमाणे अनुदान निर्धारीत करण्यात आले होते . परंतू बाजारात अंड्यांचा दर हा प्रतिअंडे सहा ते साडेसहा रूपयाच्या घरात असल्याने विद्यार्थ्यांना अंडी पुरविण्यात मुख्याध्यापकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अंड्यासाठी देण्यात येणारे अनुदान वाढवून मिळण्यात यावे अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती.
शासनाने आपल्या पुर्वीच्या निर्णयात सुधारणा करत नवीन शासन निर्णय निर्गमित केला त्यानुसार आता शाळांना राष्ट्रीय अंडी समन्वय समिती कडून निर्धारित केलेल्या बाजारभावानुसार अनुदान प्राप्त होणार आहे. या निर्णयामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे.निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी :
सध्या प्रतिअंडे पाच रूपये प्रमाणेच शाळांना अनुदान अग्रीम स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. सुधारीत शासन निर्णयानुसार बाजार दरानुसार अग्रीम स्वरूपात अनुदान उपलब्ध करण्यात यावे -लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,जिल्हा-नागपूर