लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रमजान ईद सोमवारी साजरी करण्यात येणार असून ईदची खरेदी लॉकडाऊनमुळे पूर्णपणे प्रभावित झाली आहे. मोमीनपुरा आणि आसपासचे क्षेत्र कोरोनामुळे बंद असल्याने मेवा, शेवई, अत्तर, कपडे, बूट-चप्पल,आर्टिफिशियल ज्वेलरीची खरेदी थांबविल्याने बाजाराला जोरदार फटका बसला आहे. मोमीनपुरा हॉटस्पॉट बनल्याने ईदचा बाजार लॉकडाऊन झाल्याचे दिसून येत आहे.माहितीनुसार दरवर्षी ईदची खरेदी कोट्यवधींची असते. ती यंदा नाहीच. दुकानदारांनी सांगितले की, लोक खरेदीसाठी उत्सुक होते, पण मालाचा पुरवठा ठप्प आहे. बराच स्टॉक बंद दुकानांमध्ये आहे. कपड्यांच्या दुकानांना परवानगी मिळाल्याने लोकांनी थोडीफार खरेदी केली. मात्र बूट-चप्पल, मेवा, अत्तर आणि इतर कॉस्मेटिक उत्पादनांना फटका बसला आहे. ईदचा बाजार मोमीनपुरा भागात भरतो. त्यामुळे आसपासच्या दुकानांमध्येही गर्दी असते. नागपूरच्या सर्वच भागातील मुस्लीम बांधव या भागात खरेदीसाठी येतात. सर्वाधिक खरेदी ईदच्या एक दिवसापूर्वी होते. महाल, सक्करदरा, सीताबर्डी इतवारी, काटोल, सदर या भागातील बाजारावर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. दुकानदार म्हणाले, रमजानच्या दिवसात दिल्ली, कोलकाता, आग्रा येथून नागपुरात मालाचा पुरवठा होतो. यंदा फार कमी पुरवठा झाल्याने वस्तूंचे भाव वाढले आहेत. ईदचा बाजार हा दिवाळीसारखाच असतो. पण लॉकडाऊनमुळे सर्व व्यर्थ ठरले आहे. यावर्षीच्या हंगामात आर्थिक तोटा सहन करावा लागला.